‘मला मरायचं नाहीये’ मला वंशिकासाठी जगायचंय…सतिश कौशिक यांचे शेवटचे शब्द…मॅनेजरनं सांगितलं ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

गेल्या ३४ वर्षांपासून संतोष हे सतिश कौशिक यांच्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री जेवल्यानंतर त्यांना कोणताच त्रास होत नव्हता

मुंबई: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (satish kaushik) यांच्या निधनानं बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी नवे नवे खुलासे होऊ लागले आहेत. नुकतचं सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मित्र विकास मालूच्या (vikas malu ) दुसऱ्या पत्नीने आपल्याच पतीवर आणि त्याच्या साथीदारांवर सतीश यांची हत्या केल्याचा आरोप केल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं असताना आता सतीश कौशिक  यांचे मॅनेजरने दिलेली माहिती काहीशी धक्कादायक आहे.

काय म्हणाले सतीश कौशिक यांचे मॅनेजर

सतिश कौशिक यांचे मॅनेजर संतोष राय गेल्या ३४ वर्षांपासून सतिश कौशिक यांच्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री जेवल्यानंतर त्यांना कोणताच त्रास होत नव्हता. ८.३० वाजता ते जवले. ९ मार्चला सकाळी ८.५० वाजताच्या फ्लाइटनं ते मुंबईत परत येणार होते. ते मला म्हणाले की, संतोष लवकर झोप, उद्या आपल्याला लवकर मुंबईसाठी निघायचं आहे. मी त्यांना म्हणालो की, ठिक आहे सर…आणि माझ्या खोलीत निघून गेलो.

संतोष यांनी पुढं सांगितलं की, रात्री ११ वाजता त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले की, संतोष खोलीत ये जरा. वायफायचा पासवर्ड चेंज करावा लागणार आहे. त्यांना कागज २ पाहायचा होता. ११.३० वाजता त्यांनी सिनेमा पाहायला सुरुवात केली. मी पुन्हा माझ्या रुममध्ये गेलो.

रात्री १२.०५च्या सुमारास ते मला हाका मारत होते. मी धावत त्यांच्याकडं गेलो. त्यांना विचारलं की, सर काय होतंय? इतक्या जोरात का आवाज दिला, कॉल का नाही केला? तेव्हा ते म्हणाले की, मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मला डॉक्टरकडे घेऊन चल. तेव्हा लगेचच आम्ही कारकडं गेलो.ते कारमध्ये बसले. आमच्यासोबत ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड पण होते.

‘मला मरायचं नाहीये’

आम्ही गाडीत होतो. पण त्यांच्या छातीत जास्त दुखायला लागलं होतं. ते म्हणाले लवकर चला. त्यांनी डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं आणि म्हणाले की, संतोष मला मरायचं नाहीये, मला वाचव. मला वंशिकासाठी जगायचं आहे. पण मला वाटतंय की, मी जगणार नाही…शशी आणि वंशिकाची काळजी घे. आम्ही ८ मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. पण तो पर्यंत ते बेशुद्ध झाले होते.