मेक्सिकोच्या वॉटर पार्कमध्ये माथेफिरुनं केला गोळीबार, एका अल्पवयीन मुलासह सात जणांचा मृत्यू!

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये सात वर्षीय अल्पवयीन, तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले

    मेक्सिकोमध्ये एका वॉटर पार्कमध्ये बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला (Mexico water Park Firing) आहे. या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला असुन एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये सात वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळुन गेला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे

    वाटर पार्कमधील घटना

    मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमधील गुआनाजुआटो शहराच्या दक्षिणेस सुमारे 65 किमी (40 मैल) अंतरावर असलेल्या कॉर्टझार या छोट्या गावात असलेल्या रिसॉर्टवर ही घटना घडली आहे. यावेळी वाटर पार्कमध्ये या हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये सात वर्षीय अल्पवयीन, तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.


    सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक धावताना, रडताना, किंचाळताना आणि मुलांना मिठी मारताना दिसत आहेत. मेक्सिकोचे पोलीस आणि तेथील सैनिक हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या गोळीबारामागे कोणाचा हात होता हे अद्याप समजू शकलेले नाही, असे स्थानिक सुरक्षा विभागाने सांगितले.