धक्कादायक; भारतीय कंपनीचे कफ सिरप उझबेकिस्तानमधील १८ मुलांच्या जीवावर बेतले, गांबियाची पुनरावृत्ती

नोयडा येथील मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या डॉक-१ मॅक्स सिरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये आतापर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप देण्यात आले होते.

    नवी दिल्ली : भारतीय कंपन्यांनी तयार केलेले कफ सिरप (Cough Syrup) उझबेकिस्तानमध्ये (Uzbekistan) १८ मुलांच्या जीवावर बेतले आहे. याबाबतचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. काही दिवसांपूर्वीच गांबिया (Gambia) देशात कफ सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाला होता. भारतातील औषधनिर्मिती कंपन्यांनी हे कफ सिरप तयार केले होते. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांना कफ सिरप देताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते.

    उझबेकिस्तानने आरोप केलेली कंपनी ही मूळची भारतीय असून तिचे नाव मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (Marion Biotech Private Ltd) असे आहे. उझबेकिस्तानमध्ये २०१२ साली या कंपनीची नोंद करण्यात आली होती. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली असून याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात मुलांचा मृत्यू का झाला असावा, याबाबत सांगितले आहे.

    नोयडा येथील मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या डॉक-१ मॅक्स सिरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये आतापर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप (Dok-1 Max Syrup) देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले. हे औषध प्रमाणापेक्षा जास्त आहे, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

    ‘या सिरपमध्ये पॅरासिटॉमॉल हा मुख्य घटक आहे. डॉक-१ मॅक्स सायरपचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. सर्दीवरील उपाय म्हणून डॉक्टरांनी सुचवलेले नसताना फक्त औषध विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार हे औषध देण्यात आले. याच कारणामुळे मुलांची प्रकृती खालावली, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड औषधनिर्मिती कंपनीने आपल्या सात कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.