उदयपूरमध्ये धक्कादायक प्रकार; 4 महिन्यांचं बाळ आणि चार मुलांसह कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या

    राजस्थानमधील उदयपूर च्या गोगुंडा येथे सोमवारी एकाच कुटुंबातील सहा जण मृतावस्थेत आढळले. घरातील एका खोलीतून चार निष्पाप लोकांसह दाम्पत्याचे मृतदेह सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. हे प्रकरण झरोली येथील आहे.घराचा दरवाजा उघडल्याने पोलिसही अवाक झाले. यावेळी पोलिंसांना खोलीभर मृतदेह पडलेले आढळले. पोलिसांनी सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. घर सील करण्यात आले आहे.

    फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करून घराची झडती घेण्यात आली. प्रकाशच्या घराबाहेर कच्चा व्हरांडा आहे. त्याच्या आतल्या खोलीत सर्व लोकांचे मृतदेह आढळून आले. प्रकाश यांचे घर त्यांचा धाकटा भाऊ दुर्गाराम यांच्या घरासमोर आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने भावाला संशय आला. त्याने दरवाजा उघडला असता आतमध्ये मृतदेह आढळून आले.

    गणेश (5 वर्षे), पुष्कर (4 वर्षे), रोशन (2 वर्षे) ही तीन मुले लटकलेल्या अवस्थेत सापडली आहेत. त्याचवेळी प्रकाशची पत्नी तिच्या चार महिन्यांच्या मुलासह बेडवर मृतावस्थेत आढळून आली. प्रकाश तीन महिन्यांपूर्वी गुजरातमधील सुरत येथून परतला होता. तो तिथल्या स्वयंपाकघरात साफसफाईचं काम करायचा. प्रकाश हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. यामुळे तो कामावर परतला नाही. आर्थिक विवंचनेमुळे प्रकाशने मुलांना गळफास लावून घेतल्यानंतर पत्नीसह आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. तसेच पोलिसांकडून मृत्यूची कारणे अद्याप उघड झालेली नाहीत.