सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामधून अटक

मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यानं मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचं कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.

    पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल (Sidhu Musewala) याची काही महिन्यांपूर्वी गोळ्याझाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर पंजाब राज्यासह संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरून गेली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारनं या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती. अनेक दिवसांपासून गोल्डीचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. अखेर सिद्धूच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये (California) ताब्यात घेण्यात आलं असून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी समोर येत आहे. दरम्यान, अद्याप गोल्डी पकडल्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

    गोल्डी ब्रार गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडात बसून अनेक गंभीर गुन्ह्यांची सूत्र हलवत होता. कॅनडातूनच तो भारतात खून आणि तस्करीचे काम करत होता. त्यासाठी त्याला लाखो रुपये मिळत असल्याचीही माहिती समोर आली होती. परदेशात बसूनच सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकाडांच कट गोल्डी ब्रारनं रचल्याचं बोललं जात आहे. त्यानंच आपल्या गुंडांकडून सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो अमेरिकेत पळून गेला. मुसेवालाच्या हत्येसंदर्भात गोल्डी ब्रारच्या वतीनं एक व्हिडीओ जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यानं मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा कट रचल्याचं कबुल करत हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.

    अशी झाली होती सिद्धू मुसेवालाची हत्या : 

    पंजाबमधील आप सरकारनं सिद्धू मुसेवाला यांना दिलेली 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले होते. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली होती. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.