राजधानीत मुली सुरक्षित नाही! एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कॅबमध्ये बसलेल्या मुलीवर चाकूनं केले वार, चालकाच्या प्रसंगावधानानं आरोपी अटकेत

मुलगी नोकरीच्या शोधात मुलाखतीसाठी जात होती. तिने कॅबमध्ये बसतास तिच्या मागावर असलेल्या आरोपीने कॅबमध्ये घुसून तिच्यावर चाकुने वार केले.

    दिल्ली : राजधानीत मुली सुरक्षित नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस दिल्लीमध्ये महिलांवरील गुन्हांमध्ये (Delhi Crime) वाढ होताना दिसत आहे. रात्रीच्या अंधारातच नाही तर दिवसाढवळ्याही आता मुलींवर चाकु हल्ले होत आहे. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील लाडो सराई परिसरात एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कॅबमध्ये बसलेल्या तरुणीवर चाकूने हल्ला (Attack On Girl In Taxi) केला. अचानक झालेल्या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली. कॅबचालकाच्या मदतीने लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या मुलीवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

    नेमकं काय घडल?

    मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील लाडो सराई परिसरात राहणाऱ्या एका  23 वर्षीय तरुणीवर एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं आणि तिने त्याला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे तो चांंगलाच संतापलेला होता. घटनेच्या दिवशी तरुणीने कॅब बुक केली होती.  कॅब येताच ती कॅबमध्ये बसली तितक्यात तो माथेफिरु  तरुण बळजबरी कॅबमध्ये बसला आणि त्याने तरुणीवर एकामागून एक चाकूने वार केले. चाकू हल्ल्यानंतर मुलीला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तिची प्रकृती चिंताजनक आहे. लोकांनी पकडलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आणि जखमी चंद्रिकाला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. तरुणीच्या चेहऱ्यावर, मांड्या आणि बोटांवर चाकूने सुमारे 13 वार करण्यात आले.

    पोलिसांनी आधी कारवाई केली असती तर…

    या संपूर्ण प्रकरणातील पोलिसांच्या वृत्तीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर चंद्रिकाची आज अशी अवस्था झाली नसती, असे जखमी चंद्रिकाच्या आईचे म्हणणे आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी तरुण चंद्रिकाला रस्त्याने फिरताना त्रास देत असे. याविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी कारवाई केली नसल्याचं तिच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.

    दोघेही कंपनीत एकत्र काम करत होते

    दोघेही एका कंपनीत एकत्र काम करत होते आणि तिथे त्यांची मैत्री झाली, मात्र तरुणाने त्यांच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावला आणि त्याने तिला लग्नासाठी विचारले असता तिने स्पष्टपणे नकार दिला होता. चंद्रिकाला वडील नाहीत आणि तिची आई चंद्रिकाच्या पाच भावंडांना उदरनिर्वाह करण्यासाठी काम करते. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वत:ला सक्षम बनवण्याचे चंद्रिकाचे स्वप्न होते. त्यामुळे ती चांगल्या नोकरीच्या शोधात मुलाखतीसाठी जात होती.