सूरज पांचोली जियाला शिवीगाळ करत असे; जियाच्या आईचा आरोप

सूरजने सोशल मीडियाच्या माध्यमातून जियाशी संपर्क साधला आणि तिला भेटण्याचा आग्रह धरला होता. जिया त्याला भेटण्यास इच्छुक नव्हती; परंतु, २०१२ सप्टेंबरमध्ये दोघेही पहिल्यांदा भेटले. त्यावेळी तिने काही फोटो पाठवले होते आणि आम्ही मित्र असल्याचे जियाने राबियाला सांगितले.

    मुंबई : बॉलीवूड अभिनेता सूरज पांचोली (Suraj Pancholi) अभिनेत्री जिया खानचे (Jiah Khan) शारीरिक शोषण (Physical Abuse) केले आणि तिला घाणेरड्या नावांनी हाक मारत असल्याचा आरोप जियाच्या आईने बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयात केला. २०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या (Jiah Khan Sucide) केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सूरज पांचोलीला अटक केली.

    सध्या सूरज जामीनावर आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात जियाची आई राबियाची साक्ष नोंदवली जात आहे. राबिया खानने जियाचा बॉलीवूडमधील कारकीर्द आणि पांचोलीसोबतचे नाते याबद्दल न्यायालयाला सांगितले की, सूरजने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जियाशी संपर्क साधला आणि तिला भेटण्याचा आग्रह धरला होता. जिया त्याला भेटण्यास इच्छुक नव्हती; परंतु, २०१२ सप्टेंबरमध्ये दोघेही पहिल्यांदा भेटले. त्यावेळी तिने काही फोटो पाठवले होते आणि आम्ही मित्र असल्याचे जियाने राबियाला सांगितले.

    ऑक्टोबर २०१२ पर्यंत दोघे एकमेकांच्या घरी राहू लागले. सुरुवातीला लंडनच्या घरी भेटीदरम्यान, जिया आनंदी दिसत होती; मात्र, २४ डिसेंबर २०१२ रोजी राबियाला सूरजने मेसेज करून जियासोबत भांडण झाल्याची माहिती दिली आणि त्याला जियाने माफ करून दुसरी संधी द्यावी, असे म्हटले होते. दोघांमध्ये हिंसक भांडण झाले होते. तरीही जियाने त्याला दुसरी संधी दिली असल्याचे राबियाने जबाबात म्हटले आहे. त्यानंतर जिया आणि सूरज गोव्याला गेले होते. तेव्हा, आपण एका विचित्र ठिकाणी असल्याची तक्रार जियाने केली. ती तिथे राहू इच्छित नव्हती. तिथेही सूरज इतर महिलांशी इश्कबाजी करायचा, असे जियाने राबियाला सांगितले होते. त्यानंतर जिया जेव्हा लंडनला आली तेव्हा ती उदास असायची त्यावेळीच सूरजने तिचे शाब्दिक आणि शारीरिक शोषण केले आणि तिला घाणेरड्या नावांनी हाक मारत असल्याचे जियाने सांगितल्याचे राबियाने जबाबात नमूद केले आहे.