लुधियानामध्ये धाडसी चोरी! एटीएममध्ये रोकड जमा करणाऱ्या कंपनीत घुसले चोर, कामगारांना ओलीस ठेवून उडवले सात कोटी

कंपनी कार्यालयात बनवलेल्या चेस्टमध्ये रोख रक्कम ठेवली जाते. याबाहेर शुक्रवारचे संकलन सुमारे सात कोटी रुपये डब्यात ठेवण्यात आले. आरोपींनी सुमारे दोन ते अडीच तास संपूर्ण परिसराची तपासणी करून तेथे उभ्या असलेल्या व्हॅन आदींची झडती घेतली.

  ऐरव्ही एटीएममध्ये चोरी होण्याच्या घटना झाल्याचं ऐकण्यात येत. मात्र, आता चोरांनी एक पाऊल पुढे टाकत चक्क एटीएममध्ये  पैसे जमा करणाऱ्या कंपनीत चोरी केली आहे. लुधियानाच्या राजगुरु नगरमध्ये एटीएममध्ये (ATM) पैसे जमा करणाऱ्या सीएमएस या कंपनीतून सुमारे सात कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे. कंपनीच्याच व्हॅनमधील रोकड घेऊन चोर पळून गेले. ही घटना रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी सात वाजता पोलिसांना याची माहिती मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना मुल्लानपूर येथील पंडोरी गावात कॅश व्हॅन सापडली असून त्यात दोन शस्त्रेही आढळली आहेत.

  दहा जणांची होती टोळी

  मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दहा जण कंपनीच्या आवारात घुसले. यातील दोन जणांनी मागच्या मार्गाने कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करून दरवाजा उघडला. यानंतर उर्वरित आरोपी आत आले आणि त्यांनी तेथे तैनात असलेल्या दोन गार्ड आणि तीन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. यानंतर रोख रक्कम लुटून ते पळून गेले.

  कंपनीच्या चेस्टबाहेर पैसे ठेवले होते 

  कंपनी कार्यालयात बनवलेल्या चेस्टमध्ये रोख रक्कम ठेवली जाते. याबाहेर शुक्रवारचे संकलन सुमारे सात कोटी रुपये डब्यात ठेवण्यात आले. आरोपींनी सुमारे दोन ते अडीच तास संपूर्ण परिसराची तपासणी करून तेथे उभ्या असलेल्या व्हॅन आदींची झडती घेतली. यानंतर बॉक्समध्ये ठेवलेले सात कोटी रुपये घेऊन कंपनीच्या व्हॅनमध्ये पळून गेले. सकाळी सात वाजता ओलिस असलेले कामगार दरवाजा तोडून बाहेर आले आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सेन्सरची वायर कापली आणि डीव्हीआरही काढून घेतला.

  सहा महिन्यांपूर्वी कार्यालयाचं झालं स्थलांतर

  सहा महिन्यांपूर्वीच कंपनीचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यालयाला दोन दरवाजे आहेत. मागच्या गेटच्या बाजूला मॅरेज पॅलेस आहे, तर मुख्य गेटसमोर चेंबर्स आहेत. गेटसमोरच बांधकाम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढी रोकड ठेवण्यासाठी हा भाग सुरक्षित नाही, असा इशारा मुख्यालयाने आधीच दिला होता. या कार्यालयात सुमारे 35 वाहने उभी असून 300 कर्मचारी येथे काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण यंत्रणा माहीत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्याचा या दरोड्यात सहभाग असावा.