बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींची हत्या करण्याची धमकी, भावाला आला फोन म्हणाले..’ तेराव्याच्या तयारीला लागा’

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा चुलत भाऊ असलेल्या लोकेश गर्ग यांना हा धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.

    छतरपूर- सध्या चर्चेत असलेल्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Bageshwar Dham) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी (Threat call) मिळालीये. अमर सिंह नावाच्य़ा व्यक्तीनं शास्त्रींच्या चुलत भावाला फोन करुन ही धमकी दिल्याची माहिती आहे. फोनवर अमर सिंहने सांगितले आहे की, शास्त्री आणि त्यांच्या कुटुंबाच्या तेराव्याची तयारी करुन ठेवा. या प्रकरणी बमीठा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे.

    या प्रकरणाच्या चौकशीसाठी 25 पोलिसांची स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने त्याचे नाव चुकीचे सांगितल्याची माहिती आहे. आता या धमकीनंतर बागेश्वर धामच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलीय. धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षारक्षकांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    धीरेंद्र शास्त्रींच्या चुलत भावाची तक्रार

    चुलत भाऊ असलेल्या लोकेश गर्ग यांनी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. कॉल केलेल्या व्यक्तीने धीरेंद्र शास्त्री यांना फोन देण्यास सांगितले. हा फोन लोकेश यांच्या वडिलांनी रामावतार यांनी घेतला होता. रामावतार यांनी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, असे उत्तर दिले. त्यावर धमकी देणाऱ्याने, परिवारासह तेराव्याची तयारी करुन ठेवा, असे साांगितले. कॉलरनं स्वताचे नाव अमरसिंह असे सांगितत्लायचाही रामावतार यांचा दावा आहे. त्यानंतर त्यानं फोन कट केला. बागेस्वर धामचे स्वामी असलेल्या धीरेंद्र शास्त्री यांच्या हत्येचा कट परदेशात रचण्यात येत असल्याचं डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी सांगितलं होतं.

    बागेश्वर धामची व्यवस्था पाहतात लोकेश

    लोकेश हे धीरेंद्र शास्त्री यांचे चुलत बंधू असून, त्यांचे नीकटवर्तीयही मानण्यात येतात. बागेश्वर धामची व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडं आहे. धाम परिसरात त्यांचं रेस्टरंटही असून ते सध्या भाड्यानं देण्यात आलेलं आहे.

    महाराष्ट्रातही बागेश्वर महाराज वादात

    बागेश्वर सरकार हे समोरच्याच्या मनातलं ओळखतात आणि त्याच्या समस्येचं उत्तर कागदावर लिहून देतात, असा प्रवाद आहे. याला राज्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाम मानव यांनी आव्हान दिलंय. दिलेलं आव्हानं स्वीकारलं आणि सिद्धी असल्याचं सिद्ध केलं तर 30- लाखांचं इनाम मानव यांनी जाहीर केलंय. त्यावर ते आव्हान स्वीकारत बागेश्वर महाराज यांनी शाम मानव यांना बागेश्वर धाममध्ये पाचारण केलेलं आहे. जर पैज हरलात तर आयुष्यभर बागेश्वर धाममध्ये धुणीभांडी करावी लागतील, असं प्रतिआव्हान धीरेंद्र शास्त्रींनी दिलेलं आहे. त्यानंतर चर्चेत आलेल्या शाम मानव यांनाही सोमवारी जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यापाठोपाठ धीरेंद्र शास्त्री यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्यानं या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय.