मध्यप्रदेशमध्ये दोन आदिवासी बहिणींवर सामूहिक अत्याचार, 7 तरुणांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, व्हिडिओही बनवला!

रेवा येथील हनुमाना पोलीस स्टेशन परिसरात १३ आणि १४ वर्षांच्या दोन चुलत आदिवासी बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सात तरुणांनी ही घृणास्पद कृत्या केलं आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली, तर दोन अद्याप फरार आहेत.

    काही दिवसांपुर्वी मध्य प्रदेशच्या सतना येथील 11 वर्षाच्या मुलीवर शारिरीक अत्याचाराची (Satana Rape News) घटना घडली. या मुलीवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेबद्दल राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच मध्य प्रदेशमधून आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रेवा (Rewa) येथे जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या १३ आणि १४ वर्षांच्या दोन चुलत बहिणींवर सात तरुणांनी सामूहिक अत्याचार केला.(Madhya Pradesh gagrape news) इतकंच नव्हे तर या आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी  तात्काळ कारवाई करत पाच मुलांना ताब्यात घेतले असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

    दोन्ही मुली जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या

    मिळालेल्या माहितीनुसार, दोन बहिणींसोबतची घडलेली ही पाशवी अत्याचाराची घटना सुमारे 15 दिवसापुर्वीची आहे. 13 आणि 14 वर्षांच्या दोन्ही बहिणी जंगलात सरपण आणण्यासाठी गेल्या होत्या. तिथे आधीच पाच मुलं होती. दोन्ही बहिणींना पाहताच आरोपींनी अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या आणखी दोन साथीदारांना फोन करून बोलावलं. त्यांचा हेतू लक्षात येताच दोन्ही बहिणी तिथून पळू लागल्या. यावर सर्व आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांना जंगलात नेले. तेथे त्यांनी मुलींना ओलीस ठेवले. त्यानंतर सात मुलांनी त्यांच्यावर अत्याचार केला. तसेच आरोपींनी त्यांना मारहाणही केली.

    आरोपींपैकी काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर घटनेची माहिती कोणालाही दिल्यास व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपी निघून गेले. आरोपींनी धमकावल्यामुळे त्यांनी कुणालाही या घटनेबद्दल सांगितलं नाही.

    पोलीस तपास सुरू

    दरम्यान, रविवारी या घटनेच व्हिडिोओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून घेत आरोपींची धरपकड सुरू केली. सपी विवेक सिंग, एएसपी विवेक कुमार लाल, डॉ. आर.पी. शुक्ला, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सीन ऑफ क्राइम युनिट यांनी पथकासह भौतिक पुरावे गोळा केले. पोलिसांना घटनेशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, त्या आधारे पुढील तपास सुरू आहे.