
मणिपूरची राजधानी इम्फाळमधील न्यू चेकोन भागातील स्थानिक बाजारपेठेत एका जागेवरून मीताई आणि कुकी समुदायांमध्ये भांडण झाले. रिपोर्टनुसार, बदमाशांनी काही रिकाम्या घरांनाही आग लावली.
इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये (Imphal) पुन्हा हिंसाचार भडकल्याची (Manipur Unrest) बातमी आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जाळपोळ झाल्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. राजधानी इम्फाळच्या न्यू चेकोन (New Checon) भागातील स्थानिक बाजारपेठेत एका जागेवरून मैतई आणि कुकी समुदायांमध्ये (Maitai And Kuki Communities) भांडण झाले. रिपोर्टनुसार, बदमाशांनी काही रिकाम्या घरांनाही आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दले तैनात आहेत.
मणिपूरमध्ये मैतई आरक्षणाच्या वादावरून अनेक दिवसांपासून हिंसाचार आणि तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांच्या शांततेनंतर सोमवारी पुन्हा हिंसाचार उसळला. 15 मे पर्यंत हिंसाचारातील मृतांची संख्या 73 वर पोहोचली होती. दंगलखोरांनी येथील अनेक घरांना आग लावली होती.
३ मे रोजी पहिल्यांदा झाला हिंसाचार
यापूर्वी ३ मे रोजी मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात हिंसाचार उसळला होता. 4 मे रोजी येथील परिस्थिती अनियंत्रित झाली. राज्य सरकारने बदमाशांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. यासोबतच सुरक्षेसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले होते.
गैरकृत्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी दिले कारवाईचे आश्वासन
हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाईचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. त्यांनी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे.
मणिपूरच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या मैतई समुदायाची आहे
मणिपूरच्या सुमारे ३.८ दशलक्ष लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक मैतई समुदायातील आहेत. मणिपूरच्या सुमारे 10% क्षेत्रावर पसरलेल्या इम्फाळ व्हॅलीमध्ये मैतई समुदायाचे वर्चस्व आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने मैतई समुदायाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
हा समाज का मागतोय आरक्षण ?
मैतई समाज आपल्या सांस्कृतिक अस्मितेसाठी आरक्षणाची मागणी करत आहे. 1949 मध्ये भारतीय संघराज्यात विलीन होण्याआधी त्यांना संस्थानात जमातीचा दर्जा होता असे समाजातील लोकांचे म्हणणे आहे. गेल्या 70 वर्षांत मैतईंची लोकसंख्या 62 टक्क्यांवरून 50 टक्क्यांच्या आसपास कमी झाली आहे.
आरक्षणाला विरोध का?
मणिपूरमधील नागा आणि कुकी जमाती मैतई समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत. नागांनी राज्याच्या 90% क्षेत्रफळावर कब्जा केला आहे आणि कुकी राज्याच्या लोकसंख्येच्या 34% आहेत. ते म्हणतात की राज्याच्या 60 पैकी 40 विधानसभेच्या जागा मीताईचे वर्चस्व असलेल्या इंफाळ खोऱ्यात आधीच आहेत. मणिपूरमध्ये राजकीयदृष्ट्या मैतई समुदायाचे वर्चस्व आहे. मैतईंना एसटी प्रवर्गात आरक्षण मिळाल्यास त्यांच्या हक्काचे विभाजन होईल, अशी भीती नागा आणि कुकी जमातींना आहे. सध्याच्या कायद्यानुसार मैतई समुदायाला राज्यातील डोंगराळ भागात स्थायिक होण्याची परवानगी नाही.