प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दिल्लीमधून स्पेशल सेलचे पोलीस आणि दिल्लीचे नार्कोटिक विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षी हा कंटेनर कस्टम विभागाने संशयित म्हणून थांबवून ठेवला होता. कंटेनर स्कॅनिंग वेळेस कंटेनरमध्ये कोणता माल आहे याची स्पष्टता न झाल्याने हा कंटेनर होल्ड करून ठेवला होता.

    उरण: जेएनपीटीच्या गोदामातून (JNPT Godown) बुधवार (ता.२१) एक संशयित कंटेनर (Suspicious Container) ताब्यात घेतला असून त्यामध्ये तब्बल १७२५ कोटी रूपयांचे २२ टन संशयित अंमली पदार्थ (narcotics) असल्याचे बोलले जाते.

    हा अंमली पदार्थ हेरॉईन (Heroin) असल्याचे बोलले जात असले तरी ही आयुर्वेदिक पावडर असल्याचे बोलले जाते. जर हे हेरॉईन असेल तर तर त्याची आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १७२५ कोटी रूपयांपर्यंत आहे.

    दिल्लीमधून स्पेशल सेलचे पोलीस आणि दिल्लीचे नार्कोटिक विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षी हा कंटेनर कस्टम विभागाने संशयित म्हणून थांबवून ठेवला होता. कंटेनर स्कॅनिंग वेळेस कंटेनरमध्ये कोणता माल आहे याची स्पष्टता न झाल्याने हा कंटेनर होल्ड करून ठेवला होता. गेल्यावर्षी आलेल्या या कंटेनरचे वजन आणि सील तेच असल्याची माहिती आहे.

    सध्या दिल्ली स्पेशल सेलचे पोलीस आणि नार्कोटीक विभागाकडून या मालाची तपासणी करण्यात येत असून तपासणी नंतर ते हेरॉईन आहे की आयुर्वेदिक पावडर आहे हे सिद्ध होईल. दिल्लीचे पोलिस मंगळवार ता.२० पासून या कंटेनरची तपासणी करत आहेत. जेएनपीएच्या स्पिडी सिएफएस मध्ये हा संशयित कंटेनर आहे. या सिएफएस मध्ये यापूर्वी अनेक वेळा अंमली पदार्थ आणि रक्तचंदन पकडले गेले आहे.

    संशयित कंटेनर आणि कस्टम विभागाने पकडलेल्या मालाचे कंटेनर या सिएफएस मध्ये साठवून ठेवले जातात. सध्या या गोदामात अनेक संशयित कंटेनर असून या परिसरात कोणालाही जाण्यास अनुमती दिली जात नाही. दरम्यान या कारवाई बद्दल न्हावा-शेवा पोलिस, आयबी आणि सीमा शुल्क विभागाला देखील कोणतीही माहिती नाही.