अल्पवयीन मुलीचं अफेयर बापाला झालं माहित, महिलेनं क्राईम वेबसिरिज पाहून मुलीच्या बॅायफ्रेंडच्याच मदतीने नवऱ्याचा ‘असा’ काढला काटा

पतीची हत्या करुन एक दिवस मृतदेह घरातच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडी येथे नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. हा खून करायच्या आधी आई आणि मुलीनं अनेक क्राईम वेब सीरिज पाहिल्या होत्या.

  पुणे: पुण्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका महिलेनं अल्पवयीन मुलीच्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जॅाय लोबो असं मृताचं नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो (Sandra Johnson Lobo) आणि तिच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे (Agnel Joy Kasbey) यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. (wife killed husband with help of minor girl’s boyfriend)

  नेमकं काय घडलं

  पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीचं अफेयर लपवण्यासाठी आणि स्वतःच्याही प्रेम संबंधामध्ये अडथळा न येण्यासाठी आईनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. पतीचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. धक्कादायक बाब म्हणजे आई आणि मुलीनं हत्या करण्याआधी काही क्राईम वेब सिरिजही पाहिल्या. त्यानंतर त्यांनी प्लॅन करुन हत्या केली.

  मुलीचं होतं अफेयर

  सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो हे पतीपत्नी असून त्यांना 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे. या मुलीचे ॲग्नैल कसबे नावाच्या मुलांसोबत प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध असल्याचं  पती जॅाय लोबोला कळल्यावर त्यांचा घरात वाद होऊ लागले. त्याने पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाणही केली होती. त्यावरून जॅाय लोबो याचा तिघांनी मिळून त्याला संपवायचं ठरवलं.

  क्राईम वेब सीरिज पाहून केला खून

  मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी सॅंड्राचे प्रेमसंबध असल्याची बाब मृत जॉन्सन लोबोला मान्य नव्हती. यावरुन तिघांमध्ये नेहमी खटके उडत. अनेकदा वाद वाढत जाऊन जॉन्सनने आई आणि मुलीला मारहाणही केली होती. त्यामुळे सततच्या मारहाणीला कंटाळून आई आणि मुलीने जॉन्सन लोबोची हत्या केली. हत्या करण्यापुर्वी मायलेकीनेवेगवेगळ्या क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि खून केला. मुलीच्या बॅायफ्रेंडच्या मदतीने आधी घरात चाकूने खून केला आणि एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला.

  दरम्यान, पोलिसांना जळालेल्या मृतदेहाचा तपास केल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी पत्नी ही पतीचा खून केल्यावर ही नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्याच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती. या प्रकरणी आता आई आणि तिच्या मुलीच्या बॅायफ्रेंडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची परिसरात एकच चर्चा होत आहे.