इंडिगोच्या फ्लाईटमध्ये पुन्हा महिलेचा विनयभंग! एफआयआरनंतर आरोपीला अटक; तीन महिन्यांतील पाचवी घटना

गेल्या दोन महिन्यांत, फ्लाइटमध्ये भारतीय प्रवाशांचा लैंगिक छळ झाल्याची किमान चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही घटना मुंबईहून निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6E-5319 मध्ये घडली.

    गेल्या काही दिवसापासून विमानात प्रवाशांसोबत गैरवर्तणूक (Misbehave In Flight) होण्याच्या अनेक घटना समोर येत आहे. कधी कोणत्या प्रवासाने सहप्रवासावर लघुशंका केली तर कधी कोणत्या प्रवाश्याचं क्रू मेमर्ससोबत भांडण झालं, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता इंडिगोच्या  फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये लाईट मंद असल्याचा फायदा उचलत एका पुरुष प्रवाशाने शेजारच्या सीटवर बसलेल्या एका महिला प्रवासीला अनेकदा स्पर्श केला. या प्रकरणी, आरोपी व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला गुवाहाटीमध्ये पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    नेमकं काय घडलं?

    गेल्या दोन महिन्यांत, फ्लाइटमध्ये प्रवाशांचा लैंगिक छळ झाल्याची किमान चार प्रकरणे समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या  घटनेनुसार, शनिवारी रात्री 9 वाजता मुंबईहून  गुवाहाटीला निघालेल्या फ्लाईटमधील महिलेने आरोप केला की तिने आर्मरेस्ट खाली केला होता आणि केबिनचे दिवे मंद झाल्यावर ती झोपी गेली होती पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला आढळले की आर्मरेस्ट वर होता आणि शेजारच्या सीटवर बसलेला पुरुष प्रवासी तिला स्पर्श करत होता.

    “मला थोडं विचित्र वाटलं कारण मला स्पष्टपणे आठवते की, मी आर्मरेस्ट खाली ठेवला होता. बरं, अर्धा झोपेत असताना, मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि पुन्हा आर्मरेस्ट खाली ठेवला आणि झोपी गेले.” महिलेच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने ती आश्चर्याने उठली आणि तिने पाहिले की पुरुष प्रवाशाचा हात तिच्यावर आहे.  मी पुन्हा डोळे मिटून झोपले होते. मात्र,  काही मिनिटांनंतर पुरुष प्रवाशाने पुन्हा तिला अनुचित स्पर्श करण्यास सुरुवात केली. “मात्र, त्याने जेव्हा त्याने पुन्हा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी माझा हात बाजूला केला, किंचाळले, सीट लाइट चालू केले आणि केबिन क्रूला बोलावले,” यानंतर आरोपीने आपल्या कृत्याबद्दल माफी मागायला सुरुवात केली.

    इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, एका महिला प्रवाशाकडून कथित लैंगिक छळाची तक्रार मिळाल्यानंतर, प्रवाशाला गुवाहाटी येथे पोहोचल्यावर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. “तक्रारदाराने स्थानिक पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे आणि आवश्यक असेल तेथे आम्ही तपासात मदत करू,” असे एअरलाइनच्या निवेदनात म्हटले आहे.