इंटरनेटवर बघितली त्याने आत्महत्येची पद्धत अन् उचललं टोकाचं पाऊल, तरुणाचा मृतदेह पाहून पोलिसांनाही बसला धक्का

एका तरुणाने  नायट्रोजन गॅसचा मास्क तोंडावर लावून आत्महत्या(Suicide Using Nitrogen Gas) केली असल्याची माहिती मिळाली आहे.

  दिल्लीतील(Delhi) एका हॉटेलमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे.  एका तरुणाने  नायट्रोजन गॅसचा मास्क तोंडावर लावून आत्महत्या(Suicide Using Nitrogen Gas) केली असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

  पोलिसांना तरुणाकडे एक सुसाइड नोटही सापडली आहे. या सुसाइट नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. आत्महत्येची पद्धत तरुणाने इंटरनेटवर पाहिल्याचा खुलासाही त्याने सुसाइड नोटमध्ये केला आहे.

  कर्ज आणि बेरोजगारीमुळे त्रस्त राकेश दास या ३२ वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्र उशिरा हॉटेलच्या खोलीत नायट्रोजन गॅसचा मास्क तोंडावर लावून आत्महत्या केली आहे.

  सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) रजनीश वर्मा यांनी सांगितलं की, फेस-३ येथील चोटपुर कॉलनीत राहणाऱ्या राकेश दास (३२) या तरुणाने सेक्टर १२ स्थित एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एक खोली बुक केली होती. त्याच रात्री उशिरा पोलिसांना त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

  घटनास्थळी पोलिसांनी पाहिलं की, राकेश दार याने एका गॅस सिलेंडरच्या माध्यमातून तोंडावर मास्क लावला होता. नायट्रोजन गॅस शरीरात गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

  घटनास्थळावरुन एक सुसाइड नोटही सापडली आहे. यामध्ये लिहिलं आहे की, तो आधी एका खासगी कंपनीत काम करीत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याची नोकरी सुटली. त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. तो नुकताच बाबा झाला होता. पत्नीच्या प्रसूतीदरम्यान खूप खर्च झाला होता. त्याच्यावर पाच लाख रुपयांहून अधिक कर्ज आहे. त्याने एका कंपनीत गुरुवारपासून नोकरी सुरू केली होती. मात्र तो त्या नोकरीत खूश नव्हता.तो खूप निराश झाला होता.

  सुसाइड नोटमध्ये तरुणाने लिहिलं होतं की, त्याने आत्महत्येची ही पद्धत इंटरनेटवर पाहिली होती. त्याने सुसाइड नोटमध्ये आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे.