4 कोटी लशी गायब? उत्पादन आणि लसीकरणाच्या आकडेवारीत तफावत; भारत बायोटेकने उत्तर देणे टाळले

कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून देशात मोठा वाद सुरू आहे. अशातच हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीमध्ये तयार झालेल्या लसीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारत बायोटेकची निर्मिती असणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या एकूण निर्मिती आणि पुरवठ्याच्या आकडेवारीत तफावत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 2.1 कोटी कोवॅक्सिन लशीचे डोज नागरिकांना देण्यात आले. पण, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या 6 कोटी लस उपलब्ध असायला हव्या होत्या. त्यामुळे उर्वरित 4 कोटी लशी गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून देशात मोठा वाद सुरू आहे. अशातच हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीमध्ये तयार झालेल्या लसीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारत बायोटेकची निर्मिती असणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या एकूण निर्मिती आणि पुरवठ्याच्या आकडेवारीत तफावत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 2.1 कोटी कोवॅक्सिन लशीचे डोज नागरिकांना देण्यात आले. पण, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सध्या 6 कोटी लस उपलब्ध असायला हव्या होत्या. त्यामुळे उर्वरित 4 कोटी लशी गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    कंपनीचे सीएमडी कृष्णा ईला यांनी 20 एप्रिलला ऑन रिकॉर्ड दिलेल्या माहितीनुसार 1.5 कोटी डोस मार्चमध्ये उत्पादित करण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत 2 कोटी मात्रा निर्माण करण्यात आल्या. त्यानंतर मे महिन्यात 3 कोटी डोज निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले होते. समजा मे महिन्यात नियोजनाप्रमाणे लशींचे उत्पादन झाले नाही. तरी मार्च आणि एप्रिल महिन्यातील मिळून 3.5 कोटी लस आणि मे महिन्यात समजा 2 कोटी लशींचे उत्पादन झाले. केंद्राने 24 मे रोजी सुप्रीम कोर्ट आणि केरळ हायकोर्टाला दिलेल्या माहिनीनुसार भारत बायोटेक महिन्याला 2 कोटी लशींचे उत्पादन करत आहेत. हे सर्व लक्षात घेता, कोवॅक्सिनच्या 5.5 कोटी लसीचे आतापर्यंत उत्पादन झाले, असे दिसून येत.

    भारत बायोटेकने उत्तर देणे टाळले

    याशिवाय लसीकरण सुरु होण्याआधी 5 जानेवारीला कृष्णा ईला यांनी म्हटले होते की, कंपनीकडे 2 कोटी लशींचा साठा आहे. यामुळे एकूण संख्या होते 7.5 कोटी. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील उत्पादन 0.5 कोटी गृहित धरल्यास आतापर्यंत लशीचे एकूण उत्पादन 8 कोटी झाले. भारताने लस डिप्लोमसी अंतर्गत आतापर्यंत कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचे 6.6 कोटी डोस निर्यात केले आहेत. यापैकी कोवॅक्सिनचे 2 कोटी डोज निर्यात करण्यात आले, असे गृहीत धरले तरी, कंपनीकडे किमान 6 कोटी लशीचे डोस शिल्लक राहणे आवश्यक होते. यातील केवळ 2.1 कोटी लस भारतात वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात तुटवडा जाणवत असताना इतर लशी गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, भारत बायोटेक कंपनीने याबाबत भाष्य करण्यास टाळले आहे.