४०० कैदी दिसणार पेट्रोल पंपावर ; पंजाब सरकारचा अभिनव उपक्रम, जाणून काय आहे नेमकं प्रकरण

पंजाबमध्ये जेलच्या जमिनीवर १२ पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. हे पेट्रोल पंप इंडियन ऑईलद्वारे सुरू करण्यात येतील, पंजाब सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांना 'उजाला पंजाब' हे नाव ब्रँड म्हणून वापरण्यास मंजुरी दिली आहे.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली.

    पंजाब सरकारने पंजाबमधील तुरुंग विकास बोर्डाकडे असणार्‍या १२ जमिनींवर पेट्रोल पंप उभारण्यासाठी लागणाऱ्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. इंडियन ऑईल पेट्रोल पंपाची उभारणी करणार आहे. ४०० कैद्यांना पेट्रोल पंपावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. पंजाब सरकारला या माध्यमातून दर महिन्याला ४० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. मुख्यमंत्री बोर्डाचे सदस्य सचिव आणि जेलचे अतिरिक्‍त डीजीपी प्रवीण सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली वागणूक असणाऱ्या कैद्यांना हे काम दिले जाणार आहे. काम देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महिला कैद्यांना प्राधान्य दिले जाईल.

    पंजाबमध्ये जेलच्या जमिनीवर १२ पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. हे पेट्रोल पंप इंडियन ऑईलद्वारे सुरू करण्यात येतील, पंजाब सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांनी बनवलेल्या उत्पादनांना ‘उजाला पंजाब’ हे नाव ब्रँड म्हणून वापरण्यास मंजुरी दिली आहे.

    पंजाब सरकारने तुरुंग प्रशासनाच्या जागेमध्ये सुरु असणाऱ्या कारखान्यांना पंजाब तुरुंग विकास बोर्डाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रविण सिन्हा यांनी तुरुंगात सुरू असलेल्या कारखान्यांमधून सध्या चादर, टॉवेल, फर्निचर, स्टेशनरी , साबण आणि सॅनिटायझर तयार केला जात असल्याची माहिती दिली आहे.