बोगस कोरोना चाचणीचे रिपोर्ट देणाऱ्या ५ जणांना अटक, लॅबला अंधारात ठेऊन सुरू होता कारभार, पोलिसांनी केला पर्दाफाश

जेनेस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक लॅबमध्ये हे पाचजण काम करत होते. कोरोना टेस्टसाठी येणाऱ्या काहीजणांना कंपनीच्या अपरोक्ष ते रिपोर्ट देत होते आणि त्याबदल्यात पैसे घेत होते. हा प्रकार गेले काही आठवडे सुरू होता. मात्र जेव्हा रिपोर्ट मिळालेले काहीजण रिपोर्ट व्हेरिफाय करण्यासाठी जेव्हा पुन्हा लॅबमध्ये आले, तेव्हा त्यांचा भांडाफोड झाला. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालतीय. दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाची चाचणी करायला येणाऱ्या नागरिकांना बोगस रिपोर्ट देणाऱ्या पाच जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्यांचे रिपोर्ट कशा प्रकारे दिले जात आहेत, हे पाहून अनेकांना धक्का बसलाय.

    जेनेस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक लॅबमध्ये हे पाचजण काम करत होते. कोरोना टेस्टसाठी येणाऱ्या काहीजणांना कंपनीच्या अपरोक्ष ते रिपोर्ट देत होते आणि त्याबदल्यात पैसे घेत होते. हा प्रकार गेले काही आठवडे सुरू होता. मात्र जेव्हा रिपोर्ट मिळालेले काहीजण रिपोर्ट व्हेरिफाय करण्यासाठी जेव्हा पुन्हा लॅबमध्ये आले, तेव्हा त्यांचा भांडाफोड झाला.

    कंपनीच्या लेटरहेडवर ते रुग्णांचे कोरोना रिपोर्ट देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम घेत असत. मात्र कंपनीच्या रेकॉर्डवर त्याची नोंद न करता ती रक्कम स्वतःच हडप करत असत. दोन लॅब असिस्टंट आणि एका डॉक्टरचाही यात समावेश होता. रिपोर्ट व्हेरिफाय करण्यासाठी आल्यानंतर मात्र कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतल्याचं किंवा त्यांना रिपोर्ट दिल्याचं कुठलंही रेकॉर्ड सापडलं नाही. तेव्हा कंपनीच्या झालेला प्रकार लक्षात आला.

    कंपनीनं या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला असून कुठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दाखवलीय. काही कर्मचाऱ्यांनी पैशांच्या मोहाने असे बेकायदा कृत्य केल्याचे पाहून धक्का बसल्याचं लॅबच्या वतीनं कळवण्यात आलंय. मात्र सरकारी चौकशीला सहकार्य करू आणि दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करू,असं कंपनीनं म्हटलंय.