शेतकरी आंदोलनाची धग कायम- १५दिवसात दुपटीने वाढले आंदोलक

केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या गर्दीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर डीसी श्यामलाल पुनिया यांनी जिल्हाभरात कलम १४४ लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

 

दिल्ली: कृषी सुधारणा कायद्यांविरोधात मागील १७ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात येत आहे. मागील १५ दिवसात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पंजाबमधून दोन दिवसांत१५  हजारांहून अधिक शेतकरी कुंडलीच्या सीमेवर पोहोचले आहेत. केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या गर्दीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर डीसी श्यामलाल पुनिया यांनी जिल्हाभरात कलम १४४ लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी २७ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या सीमेवर तळ ठोकून आहेत. पहिल्या दिवशी अंदाजे दोन हजार ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहने २५हजार शेतकऱ्यांसह कुंडलीच्या सीमेवर पोहोचली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे १५ दिवसांत शेतकऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पंजाबमधील शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांमधून दिल्लीत येत आहेत, त्याचप्रमाणे हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि इतर राज्यांतील शेतकरी पोहोचत आहेत.

विद्यार्थ्याना परत पाठविले
आंदोलक शेतकऱ्यांनी राजकीय पक्षांना आंदोलानापासून दोन हात दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी दिल्ली – उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथे शेतकरी आंदोलनात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी व विद्यार्थिनीही पोहोचले होते. हे सर्व जण या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. परंतु शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना माघारी पाठविले. यावर भाष्य करताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी या आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला तसेच त्यांनी आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे असेही ते म्हणाले.

गोडसे, सावरकरांचा डीएनए असलेल्यांनाच देशद्रोही दिसतात

देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून अविरत आंदोलन करत आहे. पण सरकारला मात्र हे आंदोलन दडपायचे आहे. ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा डीएनए आहे, त्याच लोकांना (नेत्यांना) या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात, अशी बोचरी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनिल सिंग साजन यांनी केली. आमच्या विरोधात कितीही खटले दाखल करण्यात आले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा आंदोलन दडपण्यासाठी ठोकशाहीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहिल, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला.