पंजाबमध्ये विषारु दारु प्यायल्याने ८६ लोकांचा मृत्यू , मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

  • मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणात कोणताही लोकसेवक किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाचे विषारी दारूचे उत्पादन व विक्री थांबविण्यात अपयश हे लाजिरवाणे आहे.

पंजाब : पंजाबमधील विषारी दारूच्या दुर्घटनेत शनिवारी मृत्यूचे प्रमाण वाढून ८६ झाले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या प्रकरणात सात उत्पादन शुल्क अधिकारी आणि सहा पोलिसांना निलंबित केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सरकारने मृतांच्या कुटूंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.पंजाबमधील तरन तारणमध्ये ६३, त्यानंतर अमृतसरमध्ये १२ आणि गुरदासपूरमधील बटाला येथे ११ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत, राज्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या दुर्घटनेत ३९ लोकांचा मृत्यू झाला होता. 

एका अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी  सहा पोलिसांसह सात उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित अधिका्यांमध्ये दोन पोलिस उपअधीक्षक आणि चार पोलिस स्टेशन पभारींचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणात कोणताही लोकसेवक किंवा अन्य व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, पोलिस व उत्पादन शुल्क विभागाचे विषारी दारूचे उत्पादन व विक्री थांबविण्यात अपयश हे लाजिरवाणे आहे.

पंजाबमधील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारूच्या दुर्घटनेत ८६ जण ठार झाल्यानंतर पोलिसांनी राज्यात १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापे मारताना आणखी १७ लोकांना अटक केली. अमृतसर, गुरदासपूरच्या बटाला आणि तरण तारणमध्ये दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी आठ जणांना अटक केली. यासंदर्भात आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांच्या छापेमारीमध्ये जप्त केलेल्या मालाचे रासायनिक विश्लेषण केल्याचा कोणताही अहवाल मिळालेला नाही, परंतु खोलवर केलेल्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की ही सामग्री पेंट किंवा हार्डवेअर उद्योगात वापरली जाणारी असावी.