आयकर विभागाची भन्नाट आयडिया; कर चुकव्याची माहिती द्या, कोटीची बक्षिसे जिंका!

जे लोक आयकर विभागापासून आपली संपत्ती लपवून ठेवत आहेत, त्यांची संपत्ती पकडून या दिल्यास ५ कोटी पर्यंतच बक्षीस पकडून देणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.

नवी दिल्ली: अनेकदा उद्योगपती, व्यापारी , राजकारणी महागड्या गाड्यांमधून फिरतात, त्यांच्याकडे असलेल्या बेहिशोबी संपत्तीविषयी आयकर विभागाला सांगत नाहीत, अशा लोकांना चाप बसवण्यासाठी आयकर विभागाने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. जे लोक आयकर विभागापासून आपली संपत्ती लपवून ठेवत आहेत, त्यांची संपत्ती पकडून या दिल्यास ५ कोटी पर्यंतच बक्षीस पकडून देणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.
यासाठी आयकर विभागाने एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याद्वारे एखाद्याकडे काळा पैसा, बेफाम संपत्ती किंवा कर चुकवत असल्याची माहिती असेल तर ती थेट सरकारला देता येईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मंगळवारी ही लिंक सुरु केली आहे. सीबीडीटीने सांगितले की ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in वर ‘कर चोरी किंवा बेनामी मालमत्ता’ची लिंक सुरु केली आहे.

या सुविधेंतर्गत ज्याच्याकडे पॅन किंवा आधार नंबर आहे किंवा ज्याच्याकडे पॅन, आधार नंबर नाहीय तो देखील तक्रार दाखल करू शकणार आहे. या ऑनलाईन सुविधेमध्ये ओटीपी आधारित प्रक्रियेंतर्गत कोणीही आयकर कायदा 1961 चे उल्लंघन, अघोषित संपत्ती कायदा आणि बेनामी व्यवहार कायद्यांतर्गंत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे. त्याला बेनामी संपत्ती प्रकरणात १ कोटी तर विदेशांमध्ये काळेधन ठेवणाऱ्यांची माहिती दिल्यास काही अटींसह 5 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली आहे.