राजधानीतील राजकीय हालचालींना वेग ; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याची लागणार वर्णी

नारायण राणेंनी गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विशेषत: शिवसेनेवर तर थेट आणि गंभीर आरोप करताना नारायण राणे दिसतात. त्यामुळे त्यांचं हेच काम लक्षात घेऊन त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत.

    नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणारा असल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीकोनातून राजधानीतील घडामोडीना वेग आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार हिना गावित यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. व्यतिरिक्त भूपेंद्र यादव , पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
    दिल्लीच्या भाजप राष्ट्रीय कार्यालयातून नारायण राणे यांना फोन आला असून त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचे स्थान जवळपास निश्चित झाले असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

    नारायण राणेंनी गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विशेषत: शिवसेनेवर तर थेट आणि गंभीर आरोप करताना नारायण राणे दिसतात. त्यामुळे त्यांचं हेच काम लक्षात घेऊन त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    मागील आठवड्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकींच्या सत्रामध्ये मंत्र्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात ८१ सदस्य असतील. सध्या ५३ मंत्री आहे, म्हणजे नव्याने २८मंत्री सहभागी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच जणांना संघटनाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याच्या शक्यता आहेत.