राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कुणाची वर्णी ; मुकुल वासनिक व अविनाश पांडे यांच्यात चुरस

मुकुल वासनिक यांचे पक्षातील संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते राहिले आहेत. मात्र, गुजरात काँग्रेसमधील वाद-विवाद सोडवून स्थानिक पातळीवर नेत्यांचे मनोमिलन घडवून आणण्यामध्ये ते फार प्रभावी ठरतील असं दिसत नाही.

    नवी दिल्ली: मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झाले. यानंतर गुजरात काँग्रेसप्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडं नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेतील सदस्यत्वाबरोबर व गुजरात काँग्रेस प्रभारी या दोन्ही जागा रिक्त असल्याने या जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसमधील नेते आता फिल्डिंग लावत आहेत. या दोन्ही जागांसाठी कोणाची नेमणूक करावी यासाठी राहूल गांधी, प्रियांका गांधी आणि अशोक गहलोत या तिघांनी मिळून काही नावं काढली असल्याचे आता सांगण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक आणि माजी महासचिव अविनाश पांडे या दोघांची नावे जास्त चर्चेत आहेत.

    मात्र नेमणुकीवर राहुल गांधी व प्रियांका यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियांका गांधी या मुकुल वासनिक यांच्या नावाच्या बाजूने आहेत. तर राहुल गांधी अविनाश पांडे यांच्या नावाला पसंती देत आहेत. पांडे हे सोनिया गांधींच्या विश्वासातले असल्याचे मानलं जातं. महत्त्वाचे म्हणजे राजस्थान काँग्रेसच्या प्रभारी पदी असताना त्यांनी सचिन पायलट यांची पक्षातील दगाबाजीची खेळी हाणून पाडण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. याच कारणामुळं अशोक गेहलोत यांचादेखील अविनाश पांडे यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुकुल वासनिक यांचे पक्षातील संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे. सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते राहिले आहेत. मात्र, गुजरात काँग्रेसमधील वाद-विवाद सोडवून स्थानिक पातळीवर नेत्यांचे मनोमिलन घडवून आणण्यामध्ये ते फार प्रभावी ठरतील असं दिसत नाही. त्यांना गुजरात आणि तेथील राजकीय स्थिती समजून घ्यायला बराच वेळ लागेल, पण सध्या फार वेळ घालवण्याची स्थिती नाही, कारण पुढल्याच वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दोघांशिवाय निरज डांगी, माजीमंत्री रघुवीर सिंग मीना आणि हर्षवर्धन सपकाळ यांचीही नावे चर्चेत आहेत, मात्र यातील कोणाची निवड झाल्यास प्रभारी पद दोघांकडे विभागून देण्यात येण्याची शक्यता आहे.

    राजीव सातव यांच्यामुळे राज्यसभा सदस्य पदाच्या रिकाम्या झालेल्या जागेवर विशेष करून मुकुल वासनिक यांचीच खरी नजर आहे. अविनाश पांडे हे एकदा राज्यसभा खासदार झाले होते आणि सध्या काँग्रेसमध्ये एखादा ब्राह्मण चेहरा राज्यसभेमध्ये पाठवण्याचा विचार होत आहे. कारण आता आनंद शर्मा हे देखील निवृत्त होत आहेत त्यांच्या बदली मुकुल वासनिक चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे.