
दिल्ली : पश्चिम बंगालचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता आसामला भेट देणार आहेत. अमित शाह २६ डिसेंबर रोजी आसाम दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आसाममध्येही विधानसभा निवडणुका होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची अनेक नेतेमंडळी भाजपात सहभागी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या दौऱ्यात अमित शाह पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठक घेतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेणार आहेत.
‘सुशासन दिन’ साजरा करणार
भाजपचे उपाध्यक्ष आणि पक्षाचे आसाम प्रभारी बैजयंत पांडा यांनी सांगितले की, २३ डिसेंबरला अमित शहा यांच्या भेटीपूर्वी ते राज्य दौरा करतील आणि तयारीचा आढावा घेतील. अमित शाह यांच्या दौऱ्याचे अंतिम वेळापत्रक तयार केले जात आहे असे स्पष्ट करतानाच प्रभारी म्हणून २३ डिसेंबरला आसामला जाणार असल्याचे ते म्हणाले. पांडा म्हणाले की, २५ डिसेंबर रोजी आम्ही आसाममध्ये ‘सुशासन दिन’ साजरा करणार आहोत. यानिमित्त स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मोठ्या पुतळ्याचे अनावरण आसाममध्ये होईल.
अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा
भाजप नेते पांडा म्हणाले की, आसामचे अनेक विरोधी पक्षाचे नेते पक्षाच्या संपर्कात आहेत. पांडा म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने आमदार आमच्यात सामील झाले आहेत. हे सर्व देशात आणि इतर राज्यात देखील घडत आहे. आसाममध्येही, अलिकडच्या आठवड्यात अनेक निवडलेले प्रतिनिधी स्थानिक पातळीवरील नेत्यांनीही पक्षप्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्विवाद लोकप्रियतेमुळे हे सर्व घडत आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.