'भारत बंद'ची तयारी (LIVE) | उद्याच्या 'भारत बंद'ला कुणाकुणाचं समर्थन, कसं असेल बंदचं स्वरूप? | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट10 महीने पहले

उद्याच्या ‘भारत बंद’ला कुणाकुणाचं समर्थन, कसं असेल बंदचं स्वरूप?

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
14:58 PMDec 07, 2020

राष्ट्रपती पदक परत करायला चाललेल्या खेळाडूंना पोलिसांनी रोखले

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता पंजाबमधील खेळाडूदेखील पुढं आलेत. केंद्र सरकारने हे कायदे रद्द केले नाहीत, तर आपण आपलं राष्ट्रपती पदक परत देऊ इच्छितो, अशी भूमिका या खेळाडूंनी घेतलीय. आपलं पदक परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडं चाललेल्या या खेळाडूंना पोलिसांनी रोखलंय.

14:35 PMDec 07, 2020

८ डिसेंबरचा 'भारत बंद' यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा - अशोक चव्हाण

केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा 'भारत बंद' महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, ही विनंती आहे

13:25 PMDec 07, 2020

‘भारत बंद’मध्ये आरएसएसशी संबंधित किसान मजदूर संघ सहभागी होणार नाही, ही आहेत कारणं

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत किसान मजदूर संघानं घेतलाय. जर शेतकऱ्यांनी ९ तारखेला सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली असेल, तर ८ तारखेला बंद करण्यात काहीच तथ्य नसल्याचं किसान मजदूर संघाचं म्हणणं आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य मार्गावर आहे. मात्र त्यात काही परकीय शक्ती, राष्ट्रद्रोही घटक आणि राजकीय पक्षांची घुसखोरी होत असल्यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची बीती किसान मजदूर संघानं व्यक्त केलीय.

किसान मजदूर संघ हा तीन कायदे रद्द करण्याच्या बाजूने नसून या कायद्यांचं पुनर्परिक्षण करावं, या मागणीसाठी आग्रही आहे. किमान हमीभावापेक्षा कमी किंमतीने शेतकऱ्यांचा माल खरेदी होणार नाही, याची खात्री मिळावी, ही आपली मागणी असल्याचं किसान मजदूर संघाचं म्हणणं आहे.

12:56 PMDec 07, 2020

तृणमूल काँग्रेसचा मागण्यांना पाठिंबा, मात्र संपाला विरोध

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय. शेतकऱ्यांचे मुद्दे आणि मागण्या रास्त असून त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र भारत बंद करण्याच्या मागणीला मात्र आपला पाठिंबा नसल्याचं तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगाता रॉय यांनी म्हटलंय. बंद करणे हे आपल्या तत्त्वात बसणारे नसल्याचं ते म्हणाले.

12:36 PMDec 07, 2020

पंजाबच्या काँग्रेस खासदारांची 'जंतरमंतर'वर निदर्शनं

पंजाबमधील काँग्रेसच्या खासदारांनी जंतरमंतर मैदानावर निदर्शनं करत केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. या प्रश्नावर सरकारनं तातडीनं हिवाळी अधिवेशन बोलवावं आणि कायद्यातील अन्यायकारक तरतुदी चर्चा करून काढून टाकाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नसून अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा विचारच करत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली.

11:25 AMDec 07, 2020

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करण्याच्या भाषेमुळे योगेंद्र यादव झाले ट्रोल

मंगळवारच्या 'भारत बंद'मध्ये दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा बंद करण्याच्या मागणीमुळे स्वराज अभियानचे अध्यक्ष योगेंद्र यादव समाजमाध्यमांवर चांगलेच ट्रोल होत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अत्यावश्यक सेवा बंद करण्याची भाषा योगेंद्र यादव कसे करू शकतात, असा सवाल नेटीझन्स उपस्थित करतायत.

तर शेतकरी जो माल तयार करतो, त्याची विक्री करायची की नाही, हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांचं असल्याचा दावा यादव यांनी केलाय. जो कायदा शेतकऱ्यांना उद्धवस्त करू पाहत आहे, त्याविरोधात एक दिवस त्यांनी दूध आणि भाजीपाला विकायला नकार दिला, तर त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे, असा सवालही त्यांनी केलाय.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनानं मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिलीय. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन द्यावं, असं आवाहन आंदोलक शेतकऱ्यांनी केलंय.

मंगळवारच्या ‘भारत बंद’ला देशातील बहुतांश विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय. राजकीय पक्षांसोबत वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक संघटनादेखील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. केंद्र सरकारने केलेले ३ कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेल्या ११ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, पीएजीडीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्रक काढत शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या योग्य मागण्या मान्य कराव्यात, असंही या निवेदनात म्हणण्यात आलंय.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बंदला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आपला शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीदेखील मंगळवारच्या बंदला पाठिंबा जाहीर केलाय.

अभिनेता कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षानंही या बंदला पाठिंबा दिलाय. आम आदमी पक्षानंही या बंदचं समर्थन कऱण्याचा निर्णय घेतलाय. तर आसाममध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सरकारनंही या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.

कशाकशावर परिणाम होणार?

अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांश सेवांवर या बंदचा परिणाम दिसेल, अशी शक्यता आहे. रेल्वेच्या सेवेवरदेखील या आंदोलनाचा परिणाम दिसू शकतो. रस्ते अडवले गेल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसोबत राजकीय पक्षही रस्त्यावर उतरणार असल्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१६ शनिवार
शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

लखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्र बंदला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा खा. संजय राऊत यांचा दावा योग्य आहे असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.