काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ आशिष शेलारही शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय चर्चेला उधाण

गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. शेलार अचानकपणे पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुंबई: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते आशिष शेलारही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. शेलार अचानकपणे पवारांच्या भेटीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आशिष शेलार हे शरद पवार यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, शेलार यांनी नेमकी कशासाठी पवारांची भेट घेतली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पवार मुंबई-पुण्यात सतत असतात, असं असताना त्यांची मुंबई किंवा पुण्यात भेट घेण्यासाठी शेलारांना दिल्ली का गाठावी लागली? असा सवाल केला जात आहे.

अशोक चव्हाणांनी देखील घेतली भेट ?

मराठा आरक्षणाचा तिढा सुप्रीम कोर्टात असताना, दिल्लीत आता हे प्रकरण सोडविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीत काल पार पडलेल्या ज्येष्ठ विधीज्ञांच्या बैठकीनंतर, आज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विजय वडट्टीवर आणि धानोरकर हेही उपस्थित होते. मराठा आरक्षण प्रकरण मार्गी लावायचे असेल तर केंद्र सराकरचीही भूमिका महत्त्वाची आहे, असा निष्कर्ष कालच्या विधीज्ञांच्या बैठकीत समोर आला होता. आता केंद्र सरकारच्या पातळीवर हा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. काँग्रेसमध्ये होत असलेल्या पक्षांतर्गत बदलांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.