प्रौढ महिलेला तिच्या मर्जीने कुठेही, कुणाही सोबत राहण्याचा पूर्ण अधिकार – उच्च न्यायालय

सध्या उत्तर प्रदेश आणि काही भाजपशासित राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदे आणण्याच्या तयारीत असताना हा निकाल विशेष लक्षवेधी मानला जातोय. विशेषतः कुणीही प्रौढ व्यक्ती कुठल्याही प्रौढ व्यक्तीशी संबंध ठेऊ शकतो आणि लग्न करू शकतो, असं न्यायालयानं म्हटलंय.

भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांनुसार प्रौढ महिलेला तिच्या मर्जीने कुठेही आणि कुणाही सोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयानं दिलाय. एका लक्षवेधी खटल्यात हा निकाल देताना २० वर्षांच्या तरुणीची तिच्या पतीसोबत पुन्हा एकदा दिलजमाईदेखील झाली.

सध्या उत्तर प्रदेश आणि काही भाजपशासित राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदे आणण्याच्या तयारीत असताना हा निकाल विशेष लक्षवेधी मानला जातोय. विशेषतः कुणीही प्रौढ व्यक्ती कुठल्याही प्रौढ व्यक्तीशी संबंध ठेऊ शकतो आणि लग्न करू शकतो, असं न्यायालयानं म्हटलंय.

ही तरूणी बबलू नावाच्या एका व्यक्तीसोबत राहत होती. मात्र बबलूनं तिचं अपहरण करून तिला जबरदस्तीने आपल्या घरी ठेवल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली होती. न्यायालयानं या तरुणीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जेव्हा ही तरूणी सज्ञान असून तिच्या मर्जीनेच बबलूसोबत राहत असल्याचं कोर्टात सिद्ध झालं, तेव्हा कोर्टानं तिला सुखरूप पुन्हा बबलूच्या घरी सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले.

तरुणीच्या कुटुंबीयांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला न्यायालयानं दिलाय. त्याचसोबत अशा प्रकारची तक्रार घेऊन येणाऱ्या पालकांचं प्रबोधन करण्याची सूचना कोर्टानं पोलिसांना केलीय.