देशमुख आणि टोपेंची दिल्लीत होणार झाडाझडती? दोन्ही मंत्री दिल्लीत पवारांच्या भेटीला

मुकेश अंबानींच्या घरापाशी जिलेटिन सापडल्याची घटना, त्यानंतर चर्चेत आलेलं सचिन वाझे प्रकरण, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून परमवीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी यावरून राज्य सरकारची चांगलीच बदनामी झाल्यामुळे शरद पवार नाराज असल्याचं कळतंय. विशेषतः गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर पवार चांगलेच नाराज असून गृहमंत्री अनिल देशमुख यांची पवार झाडाझडती घेणार असल्याची माहिती समजते आहे. 

    महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असून त्यांनी राज्याचे दोन मंत्री आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटीसाठी दिल्लीला बोलावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या दोन्ही मंत्र्यांकडून राज्यातील सद्यस्थितीची माहिती पवार घेतील आणि काही नवी रणनिती आखली जाईल, अशीदेखील चर्चा आहे.

    मुकेश अंबानींच्या घरापाशी जिलेटिन सापडल्याची घटना, त्यानंतर चर्चेत आलेलं सचिन वाझे प्रकरण, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून परमवीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी यावरून राज्य सरकारची चांगलीच बदनामी झाल्यामुळे शरद पवार नाराज असल्याचं कळतंय. विशेषतः गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर पवार चांगलेच नाराज असून गृहमंत्री अनिल देशमुख यांची पवार झाडाझडती घेणार असल्याची माहिती समजते आहे.

    वास्तविक, पवारांच्या विश्वासातील असल्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीप्दासारखी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगितलं जातं. देशमुखांचा चेहरा असला तरी गृहखात्याचा खरा कारभार स्वतः पवारच हाकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण गाजत असल्यामुळे गृहखात्याच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. त्यासाठी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाचारण केल्याचं सांगितलं जातंय.

    दुसरीकडे, राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळातील सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद गुरुवारी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी शरद पवार दिल्लीत चर्चा करतील, असं सांगितलं जातंय.

    मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर आता हे प्रकरण थंड होतं की विरोधक ते अधिकच लावून धरतात, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दिल्लीतील या भेटीनंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.