अनिल देशमुख यांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज सुनावणीची शक्यता

गेल्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये ईडीनं तिसऱ्यांदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. मात्र त्यांच्याबरोबर मुलालाही समन्स बजावण्यात आल्यानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही आता चौकशीचा फेरा लागल्याचं दिसत आहे.

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मनी लाँडरिंगमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून ईडीनं (ED)अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला समन्स बजावलं आहे. या आधीनं ईडीनं अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतल्या घरांवर छापेमारी केली होती. त्यावर बोलताना देशमुख यांनी म्हटलं होतं, “परमबीर सिंह यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ईडी, सीबीआय यांना तपासात संपूर्ण सहकार्य करणार आहे. ”

    प्रकरण काय?

    आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात EDने दाखल केलेल्या गुन्ह्याची सुनावणी सध्या मुंबईच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टअंतर्गत (PMLA) या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केले होते. १०० कोटींच्या वसुलीच्या या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्याला लागला आणि त्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

    याच संपूर्ण प्रकरणात ED ने मुंबईतील अंधेरी परिसरात हॉटेल आणि बार चालकाचे जबाब नोंदवले आहेत. या बारमालकाने महिन्याला अडीच लाख रुपये सचिन वाझे यांना दिल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियंत्रणानंतर बार सुरू झाल्यावर कुठलाही त्रास न देण्यासाठी हे पैसे दिल्याच सांगण्यात आलं.

    गेल्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये ईडीनं तिसऱ्यांदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. मात्र त्यांच्याबरोबर मुलालाही समन्स बजावण्यात आल्यानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांविरोधातही आता चौकशीचा फेरा लागल्याचं दिसत आहे. अनिल देशमुख आणि कुटुंबियांच्या थेट मालकीच्या ११ कंपन्याअसून अनिल देशमुख यांच्या जवळच्यांच्या मालकीच्या १३ कंपन्या आहेत, या कंपन्यांची आपसात पैशांची देवाणघेवाण होते आणि पैशाच्या व्यवहारासाठी ठोस कारण आढळून आलं नाही, याचाच अर्थ पैशांची हेराफेरी केली जात होती, असं ईडीने म्हटलंय.