कौतुकामुळे अपयश लपत नाही; प्रियांकाचा योगी सरकारवर हल्लाबोल

    दिल्ली : कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबत उत्तरप्रदेश सरकार उत्तम कामगिरी करत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी सरकारचे भरभरून कौतुक केले. योगी सरकारच्या योजना कशा जनतेच्या कल्याणासाठीच्या आहेत याबद्दलही पंतप्रधान बोलले. मात्र, यावरून आता विरोधकांच्या हातात टीकेसाठी आयते कोलीत मिळाले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याच मुद्यावरून आता योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे कोरोना परिस्थिती हाताळण्यातील अपयश लपत नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला.

    नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.