sonia and rahul gandhi

सोनिया गांधी यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक फोन करून संयुक्त बैठक आयोजित करण्याचा आग्रह करण्यात आला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सीताराम येचुरी आणि डी राजा या डाव्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पवार यांनी या नेत्यांशी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा केली होती. डी राजा यांच्यासोबतही फोनवर चर्चा केली. --------

नवराष्ट्र ब्युरो

दिल्ली. संसदेच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीसहीत ( Sonia Gandhi )विरोधकांकडून मोदी सरकारला ( Modi government) घेरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्राने लागू केलेल्या कृषी विधेयकांना सुप्रीम कोर्टोने ( Supreme court) फटकार लगावल्यानंतर विरोधकांनाही नवे बळ मिळाले आहे.. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी रोजी सुरू होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीतील संबोधनानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कृषी कायद्यांविरोधात सरकारला घेरण्यासाठी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी यांनी सोमवारी एका बैठकीचं आयोजन केले. विरोधकांच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी सरकारविरोधात एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी सुरू करण्यात आली. या बैठकीत सोनिया यांनी काही विरोधी नेत्यांशी चर्चा केली. काही जणांशी त्यांनी संवादही साधल्याची माहिती सूत्राने दिली.कृषी कायदे, ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून घेरणार

बळाच्या जोरावर लागू करण्यात आलेले कृषी कायदे तसेच ढासळलेली अर्थव्यवस्था या स्थितीवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येणार आहे. काँग्रेससहीत विरोधी पक्षांकडून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फोनाफोनींना जोर

सोनिया गांधी यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना एक फोन करून संयुक्त बैठक आयोजित करण्याचा आग्रह करण्यात आला. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सीताराम येचुरी आणि डी राजा या डाव्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पवार यांनी या नेत्यांशी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर चर्चा केली होती. डी राजा यांच्यासोबतही फोनवर चर्चा केली.

——–

चर्चेत गुंतविण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक-राहुल गांधी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनास, महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारची कानउघडणी देखील केली. त्यानंतर मंगळवारी कृषी कायद्याच्या अंमलबाजवणीला कोर्टोन स्थगितीही दिली असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक आहे. शेतकरी सरकारचा हेतू जाणतो आहे, त्यांची मागणी स्पष्ट आहे. – कृषीविरोधी कायदे परत घ्या, बस! असे राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी केले स्वागत पण आंदोलन सुरूच राहणार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी व नेत्यांनी स्वागत करीत हा नैतिक विजय असल्याचे जाहीर केले. भारतीय किसान युनियनचे नेते योगेश प्रतापसिंह यांनी जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्हटले. एक अन्य नेते जसबीर सिंह यांनी आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो परंतु जोपर्यंत एमएसपीवर कायदा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे ते म्हणाले.

चर्चेवर भर

संयुक्त किसान मर्चाने जारी केलेल्या निवेदनात आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टात काय घडले याविषयी आमचे काहाही मत नाही. आमची चर्चा सरकारसोबत होत असून पुढील चर्चा 15 जानेवारीला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

———-

ट्रॅक्टर रॅलीची तयारी

कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांतर्गत 26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांची ही ट्रॅक्टर रॅली थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगण्यात येते. ही ट्रॅक्टर रॅली यशस्वी करण्यासाठी शेतकरी तयारीला लागले आहेत. यासाठी प्रत्येक घरातील एक व्यक्ती आणि प्रत्येक खेड्यातील किमान 10 महिलांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.22-23 जानेवारीला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत सामील होतील आणि दिल्लीच्या दिशेने जातील, असे शेतकरी नेते हरिंदर सिंग म्हणाले. तसेच, जे दिल्लीला जाऊ शकत नाहीत त्यांनी आपल्या शहरांमध्ये व खेड्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली पाहिजे, जेणेकरून सरकारला मेसेज पाठवता येईल, असेही ते म्हणाले.

००००