दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, सफदरजंग रुग्णालयात दाखल

गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद(Baba Ka Dhaba Owner kanta Prasad) सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसेच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’चे (Baba Ka Dhaba Owner Suicide)मालक कांता प्रसाद(Kanta Prasad Attempts Suicide) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना गुरुवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. युट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगित्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यावरुन नंतर अनेक वाददेखील झाले.


    दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसेच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

    सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’ चर्चेत आला होता. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांची व्यथा युट्यूबवर गौरव वासन याने व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती. यानंतर त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मदतीमध्ये मिळालेल्या पैशामुळे कांता प्रसाद यांनी एक रेस्टॉरंट सुरु केलं. मात्र त्यानंतर युट्यूबवर गौरव वासन याच्यावरच मिळालेली मदत चोरल्याचा आरोप झाला आहे. त्याच्याविरोधात देणगीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गौरव वासनने हे आरोप फेटाळून लावत आपले बँक स्टेटमेंट जाहीर केले होते.

    डिसेंबरमध्ये कांता प्रसाद यांनी सुरु केलेलं रेस्टॉरंट बंद पडलं. यामुळे कांता प्रसाद यांना पुन्हा आपल्या जुन्या ढाब्यावर परतावं लागलं. यावेळी त्यांनी गौरव वासनची माफीदेखील मागितली. गौरव वासननेही त्यांची भेट घेत आपल्या मनात काही शैल्य नसल्याचं म्हणत प्रकरण मिटवलं होतं.