बळीराजाची एकजूट, ‘भारत बंद’

केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे तत्काळ रद्द करावे, या आणि इतर मागण्यांसाठी गेल्या १२ दिवसांपासून हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन पुकारले आहे. सरकार आपल्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची घोषणा केली होती.

 

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. देशभरातील अनेक शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष भारत बंदमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सहभागी झाले होते. काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकीय पक्षांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले, तर काही राज्यात शेतकऱ्यांपेक्षा राजकीय पक्षांचाच बंदमध्ये जास्त सहभाग होता. देशभरातील काही राज्यात कडकडीत बंद पाळला गेला, तर काही राज्यातील जनजीवन सुरळीत होते. भारत बंददरम्यान दिवसभरात काही राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर अनेक राज्यात हे आंदोलन शांततेत पार पडले.

देशभरातील विविध राजकीय पक्ष, अनेक संघटनांची निदर्शने
केंद्र सरकारने नुकतेच केलेले तिन्ही कृषी कायदे तत्काळ रद्द करावे, या आणि इतर मागण्यांसाठी गेल्या १२ दिवसांपासून हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्य सीमेवर आंदोलन पुकारले आहे. सरकार आपल्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची घोषणा केली होती. देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी भारत बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतकरी संघटनांसह भारत बंदला राजकीय पक्षांचेही पाठबळ मिळाले. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात निदर्शने करून शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

१२ दिवसांत ८ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती सोमवारी अचानक खालावली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगढमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला काही काळ या शेतकऱ्याने उपाचारांना प्रतिसाद दिला मात्र मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान या व्यक्तीचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार हा शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून टिकरी सीमेजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनात सहभागी होता. आंदोलनादरम्यान गेल्या १२ दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

थंडी वाढली
डिसेंबरच्या थंडीने जोर धरला असतानाही पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलनासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही हटणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. अनेक महिने आम्हाला रस्त्यावर रहावे लागले तरी आम्ही तयार आहोत, असे हे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्यापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टींची मदत सेवाभावी संस्थांकडून केली जात आहे.

केजरीवाल नजरकैद !  आपचा आरोप, पोलिसांची ‘ना’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी नजरकैद केले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सोमवारी केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. यानंतर ते आपल्या निवासस्थानी परतले होते, जिथे त्यांना नजरकैद करण्यात आले आहे असे आपचे म्हणणे आहे. केजरीवाल सोमवारी शेतकऱ्यांना भेटून आपल्या घरी परतले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घराच्या सर्व बाजूंनी बॅरिकेट्स लावले आहेत. जेणेकरून कोणीही आत जाऊ शकणार नाही किंवा आतील व्यक्ती बाहेर येऊ शकणार नाही, असे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. काही आमदारांची सोमवारी केजरीवाल यांच्यासोबत बैठक होती. त्यासाठी काही आमदार त्यांच्या निवासस्थानी गेले असता, पोलिसांनी त्यांना मारहाण केली, असा आरोपही भारद्वाज यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप नेते बसून असल्याचेही सौरभ यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी केलेली व्यवस्था
आम आदमी पक्ष आणि इतर कोणत्या पक्षामध्ये झटापट होऊ नये, किंवा आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले नाही. ही साधारण प्रक्रिया आहे, असे नॉर्थ दिल्लीचे पोलिस उपायुक्त अँटो अल्फोन्से यांनी स्पष्ट केले.

प्रयागराजमध्ये रेल्वे रोखली
समाजवादी पार्टीच्या (सपा) कार्यकर्त्यांनी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज रेल्वे स्थानकावर बुंदेलखंड एक्सप्रेस रोखली. सपा कार्यकर्त्यांनी रूळावर झोपून घोषणाबाजी केली. यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना केली.

जहानाबादमध्ये रेल रोको, चक्काजाम
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये बंद समर्थकांनी जहानाबादमध्ये रेल रोको आंदोलन केले. पाटणा-गया मार्गावरील जहानाबादसह अनेक ठिकाणी राजद कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केले. रस्त्यावर टाळ जाळून त्यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध नोंदविला. तर, पाटण्यात आंदोलकांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना आडकाठी केली. यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

राजस्थानात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
भारत बंददरम्यान राजस्थानातील जयपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत एनएसयूआयचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. यावेळी भाजपची विद्यार्थी संघटना भाजयुमो आणि एनएसयूआय कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. एनएसयुआयचे कार्यकर्ते शेतकरी आंदोलन आणि भारत बंदच्या समर्थनार्थ निदर्शने करीत भाजपा मुख्यालयासमोर आले, तेथे एनएसयुआय आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. एनएसयुआय कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली आणि भाजप कार्यालयासमोर मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. याला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी परिस्थितीवर कसेतरी नियंत्रण मिळविले. मात्र, अचानक दगडफेक सुरू झाली. यानंतर पोलिसांनी गर्दीला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला.

शेतकरी नेते देवेंद्र तिवारी पोलिसांच्या ताब्यात
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही मंगळवारी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील किसान मंचचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना लखनौमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. देवेंद्र तिवारी यांना पोलिसांनी लखनौमधील त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.

पुतळा दहन करताना कार्यकर्ते होरपळले
कृषी कायद्यांना विरोध आणि भारत बंदच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना घडली. येथे सपा कार्यकर्ते पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा दहन करीत होते. मात्र अचानक आगीचा भडका झाला आणि एका महिलेसह चार कार्यकर्ते आगीत होरपळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सपा कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहे. सपाचे कार्यकर्ते हुसैनगंज चौकात पंतप्रधान मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी पंतप्रधान मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर आपली चूक लक्षात येताच त्यांनी मुर्दाबादचे नारे लावले.

मुख्यमंत्री खट्टर यांचा सभास्थळी तोडफोड
करनालमध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा एक कार्यक्रम होणार होता. ते करनालच्या पाढा गावात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करणारे होते. यासाठी मुख्यमंत्री पंचदेव तीर्थावर जाणार होते. मात्र, सोमवारी रात्री उशिरा शेतकऱ्यांनी पाढा गावात पोहचून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आणि सभास्थळी जोरदार तोडफडो केली. शेतकऱ्यांनी खुर्च्यांची नासधूस केली आणि सभामंडपही पाडला.

भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर रावण पोलिसांच्या ताब्यात
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. या अगोदरही काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर रावण आपल्या समर्थकांसोबत उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी होताना दिसले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय लोक दल नेते इंदरजीतसिंह यांनाही गाझियाबादमध्ये त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. इंदरजीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंदमध्ये सहभाग घेण्यासाठी निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. वाराणसीतही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविंद्रपुरी भागात किसान यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली.