isi spy agent arrested in rajasthan

सरकारने संसदेत श्वेतपत्रिका काढावी आणी त्यात हेरगिरी सॉफ्टवेअरचा वापर केला की नाही याचा स्पष्ट उल्लेख असावा. जर सरकारने वा तपास यंत्रणांनी हेरगिरी केली नाही तर हेरगिरी कोणी केली हा मुख्य प्रश्न निर्माण होतो.

    दिल्ली : पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी केली शिवाय इस्राएलच्या हेरगिरी सॉफ्टवेअरचा वापर केला अथवा नाही याचाही उल्लेख त्यात असावा, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षाने या मुद्यावरून आक्रमक धोरण अंगीकारले असून यामुळे हेरगिरीच्या जाळ्यात भाजपाच अडकत असल्याचे दिसत आहे.

    केंद्राने हेरगिरीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून भारतीय लोकशाहीचे नुकसान करण्याचाच हा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले आहे. क्रोनोलॉजी आम्हालाही समजली आहे. हा सर्व प्रकार 2017-2019 या काळात घडला आहे. पेगॅसचे प्रकरणच गंभीर आहे. जैन हवाला प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी  अशी मागणी वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली.

    सिब्बल यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप केले. देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात नसून तुमच्याच सरकारच्या कार्यशैलीमुळे सरकार बदनाम होत असल्याचा पलटवार त्यांनी केला. शाह यांनी हेरगिरी प्रकरणाचे आरोप जागतिक व्यासपीठावर भारताला बदनाम करण्याचा प्रकार आहे, असे म्हटले होते.

    या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीच करण्यात यावी कारण सरकारी तपास यंत्रणांवर विश्वासच नसल्याचे सिब्बल यावेळी म्हणाले. यासोबतच ही कारवाई रेकॉर्डिंग करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, जेपीसी चौकशीची होत असलेली मागणी न्यायालयीन कक्षेत होणाऱ्या चौकशी व्यतिरिक्त असू शकते असे ते म्हणाले.