‘ताजमहलचे’ नाव होणार ‘राममहल’ भाजप आमदाराचा वादग्रस्त दावा

आग्रा येथील ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते. योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव 'राम महाल' असं ठेवण्यात येईल असं भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली:  उत्तरप्रदेशातील आग्रा येथे असलेला ताजमहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखले जाणारे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी ताजमहलचं नाव बदलून ते ‘राम महल’ केलं जाणार असल्याचा दावा केला आहे. आग्रा येथील ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव ‘राम महाल’ असं ठेवण्यात येईल असं सिंह यांनी म्हटलं आहे.

    इतकंच नव्हेत तर सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केलं आहे. “महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे” असं म्हटलं आहे.

    उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. “आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले होते. सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.