लोकसंख्या वाढीवरून भाजप खासदार बरळले ; अमीर खानबाबत केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही. मात्र, दादा आमीर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा

    नवी दिल्ली: लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी चित्रपट अभिनेता आमीर खानबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची मागणी करतानाच सुधीर गुप्ता म्हणाले, की ‘ लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे. हे देशाचं दुर्भाग्य आहे.’

    ‘आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही. मात्र, दादा आमीर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा?’ असेही ते म्हणाले आहेत.

    आपल्याला एक ना एक दिवस याचा विचार करावाच लागणार आहे. मी पाहिलं, की भारताची एक इंचही जमीन वाढली नाही आणि लोकसंख्या १४० कोटीपर्यंत पोहोचली. ही गोष्ट शुभेच्छा देण्याची किंवा अभिनंदन करण्यासारखी नाही. मागे वळून पाहिलं तर दिसतं, की भारताची फाळणी झाली होती, तेव्हा पाकिस्तानकडे जमीन जास्त गेली होती आणि लोकसंख्या कमी, असंही ते  बोलताना म्हणाले.