काळ्या कमाईचा कुबेर, रेल्वेच्या चिफ इंजिनिअरकडे सापडली कोट्यवधींची संपत्ती,  ७६ लाखांची कॅश, जमीन जुमले आणि सोने चांदी

हाजीपूरमध्ये कार्यरत असलेला चिफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर रवीश कुमारच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात मोठी मालमत्ता सीबीआयच्या हाती लागली आहे. रवीश कुमारकडे उत्पन्नापेक्षा १८३ टक्के जास्त संपत्ती असल्याचे उघड झाल्याने सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले.     

दिल्ली : भष्ट अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने राबविलेल्या देशव्यापी कारवाईत बिहारमध्ये टाकलेल्या छाप्यात सीबीआयच्या हाती घबाड लागले आहे. हाजीपूरमध्ये कार्यरत असलेला चिफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर रवीश कुमारच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात मोठी मालमत्ता सीबीआयच्या हाती लागली आहे. रवीश कुमारकडे उत्पन्नापेक्षा १८३ टक्के जास्त संपत्ती असल्याचे उघड झाल्याने सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले.

रवीशकुमार याच्या पाटण्यातील निवासस्थानी, सासरी आणि वडिलांच्या घरीही छापेमारी करण्यात आली. यात ७६ लाखांची रोकड, १५ जमीन जुमल्यांची कागदपत्रे आणि सुमारे ५० लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. रवीशकुमारचे सासरे हे माजी कामगार आय़ुक्त आहेत, त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. अद्यापही या संपत्तीची छानबीन सुरु असून, काळ्या संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाटण्यापासून दिल्लीपर्यंत फ्लॅट्स

रवीशकुमारचे दोन फ्ल्टॅट्स आणि अनेक प्लॉट्स असल्याचे उघड झाले आहे. पाटण्यासह, नोएडा आणि उत्तर प्रदेशसह इतर दोन ठिकाणी प्लॉट असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या छापेमारीचे काम मोठे असून सीबीआच्या अनेक टीम हे काम करीत आहेत.

उत्पन्नाहून १८३ टक्के अधिक मालमत्ता

रवीशकुमारने २००९ सालापासून ते २०२० सालापर्यंत आपल्या आणि नातेवाईकांच्या नावे मोठी संपत्ती आणि जमीन जुमले खरेदी केले आहेत. सीबीआय़च्या माहितीनुसार, रवीशकुनार याच्या वेतन आणि इतर उत्पन्नाच्या स्रोतातून त्याचे उत्पन्न १.०४ कोटी रुपये इतके आहे, तर रवीशच्या पत्नीची कमाई ४० लाखांच्या घरात आहे. या काळातील त्यांचा खर्च ६७.४१ लाख रुपये इतका आहे.

या हिशोबाने त्यांची बचत ही ७६.५९ लाख रुपये असायला हवी. प्रत्यक्षात मात्र रवीशकुमार आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे ३.४० कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे समोर आले आहे. उत्पन्नाच्या स्रोताहून १८३ टक्के जास्त संपत्ती असल्याच्या प्रकरणी प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली असून अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.