वाढीव दरात लसीची खरेदी?; सरकारवर तज्ञांचा आरोप

सरकार सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशील्ड लस २०० रुपयात खरेदी करत आहे. तर युरोपीयन यूनियन हीच लस जवळपास १५९ रुपयात खरेदी करत आहे..

दिल्ली. देशभारत कोरोना लसीकरणासाठी विविध राज्यांमध्ये केंद्रांवर लस पोहोचविण्यात आली आहे. मात्र, लसीच्या किमतीवरून तज्ञांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय तज्ञ मंडळींशी चर्चा करण्यात आली. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेककडून सरकार जास्त किमतीत लस खरेदी करीत असल्याचा आरोप तज्ञांनी केला आहे. खुल्या बाजारात कोरोना लसीची किंमत हजार रुपये असल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशील्ड लस २०० रुपयात खरेदी करत आहे. तर युरोपीयन यूनियन हीच लस जवळपास १५९ रुपयात खरेदी करत आहे, अशी माहिती बेल्जियमचे बजट राज्य सचिवांच्या ट्विटवरून जाहीर करण्यात आलेल्या कागदपत्रांतून उघडकीस आली आहे.

किंमत १०० रुपयांच्या जवळपास हवी
लसीच्या किमतीवरून सरकार कंपन्यांशी मोलभाव करू शकली असती, असे मत ऑल इंडिया ट्रक ॲक्शन नेटवर्कचे एनजीओ एस.श्रीनिवासन यांनी व्यक्त केले. लसीची किंमत १०० रुपयांच्या जवळपास हवी होती. सरकारने सर्वांना मोफत लस उपलब्ध केली पाहिजे.  मात्र फ्रंट लाईन वर्कस वगळता अन्य जनतेसाठी सरकारची बांधीलकी दिसून येत नाही, असेही ते म्हणाले.
सध्या बाजारात मिळणार नाही.

देशात लसीच्या केवळ आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असून बाजारात विक्री करण्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे नीती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या व्हॅक्सिनला बाजारात विक्रीसाठी मंजुरी तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार यास मान्यता देईल. सरकारने सीरम इंस्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यावेळी फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यानंतर ५० वर्षांवरील लोकांना तसेच पोलिस आणि जवानांनाचेही लसीकरण करण्यात येणार आहे.