अ‌वैध कोळसा खाण रॅकेट; सीबीआयने आवळला फास

सीबीआयने आरोपी अनूप मांझी आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. यात ईसीएल, रेल्वे आणि सीआयएसएफच्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

  • ४ राज्यात ४५ ठिकाणी छापे

दिल्ली/कोलकाता. केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) अवैध कोळसा व्यवसायावर मोठी कारवाई करीत बंगालसह चार राज्यात ४५ ठिकाणी छापेमारी केली (cbi raid on coal mafia). कोळसा माफिया अनूप मांझीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने ही छापामार कारवाई केली आहे. या प्रकरणी ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, रेल्वे आणि सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेजचे दोन महाव्यवस्थापक आणि तीन सुरक्षा रक्षकांचेही संगनमत असल्याचे उघड झाले आहे. बंगालसह झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात छापे टाकण्यात आले.

बंगाल-झारखंड सीमेवर सुरू होते रॅकेट
सीबीआयने आरोपी अनूप मांझी आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. यात ईसीएल, रेल्वे आणि सीआयएसएफच्या काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मांझी ऊर्फ लालावर कुनुस्तोरिया आणि कजोरा भागातील ईसीएलच्या लीजहोल्ड खाणींमध्ये अवैध उत्खनन आणि कोळसा चोरीचे आरोप आहेत. बंगाल-झारखंड सीमेवर हे रॅकेट सुरू असल्याचे समजते. याबाबत आयकर विभागाने तीनवेळा नोटीसही बजावली होती. बंगालमधील आसनसोल, बर्द्धवान जिल्ह्यातील दुर्गापूर, राणीगंज आणि दक्षिण २४ परगणातील बिष्णूपूरसह अन्य ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

तपासादरम्यान अधिकाऱ्याचा मृत्यू

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या घरी झडती सुरू असतानाच त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला झाला. बर्धमान जिल्ह्यातील राणीगंज येथे सरकारी कंपनीचे सुरक्षा निरीक्षत्रक धनंजय रॉय यांच्याकडे कारवाई सुरू असताना ते अचानक आजारी पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.