बारावीच्या परीक्षेला महत्वाच्या विषयांचे पेपर? सीबीएसई १२वीच्या बोर्डाबाबत निर्णय होण्याची शक्यता

सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण १७६ विषय निश्चित केलेले असतात.

    नवी दिल्ली : भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची, शिक्षण सचिवांची आणि राज्य परीक्षा बोर्डांच्या अध्यक्षांची बैठक होत आहे. आज होणाऱ्या सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भूषवणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल.

    या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याबाबत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षासंबंधी फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्ड देखील बारावी परीक्षांबाबत फॉर्म्युला जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जातेय.

    मुख्य विषयांचीच परीक्षा?

    मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षा आयोजित करताना केवळ मुख्य विषयांच्या पेपर घेऊ शकते. यामुळे बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यास देखील मदत होऊ शकणार आहे. सीबीएसई कडून बारावीच्या अभ्यासक्रमासाठी एकूण १७६ विषय निश्चित केलेले असतात.

    या विषयांपैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी विषय निवडायचे असतात. त्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप एल असे दोन भाग केलेले असतात. ग्रुप ए मधील विषय हे महत्त्वाचे मानले जातात. त्या आधारेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.