सीबीएसई प्रात्यक्षिक परीक्षा होणार ऑनलाईन ; पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली

सीबीएसईने देशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्याच्या अनुषंगाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांचे गुण अपलोड करण्यास सीबीएसई प्रादेशिक विभागाने शाळांना कळविले आहे.

    नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE)ने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शालेय अभ्यासक्रमावर आधारित मूल्यांकनामध्ये काही बदल केले आहेत. काही शाळा कोरोना महामारीमुळे प्रॅक्टिकल किंवा अंतर्गत मूल्यांकन परीक्षा घेऊ शकले नाहीत. हे लक्षात घेता बोर्डाने शाळांना ऑनलाइन परीक्षा घेण्यास आणि त्याचे गुण अपलोड करण्यास २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. ज्या विषयांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशा विषयांची यादीही सीबीएसईने जाहीर केली आहे. लेखी आणि प्रॅक्टिकल गुणांचे विभाजन, प्रकल्पाची वेळ आणि परीक्षांचा कालावधी याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
    सीबीएसईने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या विषयांसाठी बाह्य परीक्षकांची नेमणूक केली गेली नाही, त्या विषयांसाठी संबंधित शाळेतील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करतील आणि बोर्डाने दिलेल्या लिंकवर गुण अपलोड करतील. तसेच प्रॅक्टिकल परीक्षा किंवा प्रोजेक्टचे मूल्यांकन करण्यासाठी बाह्य परीक्षकाची नेमणूक केली जाते. यंदा बाह्य परीक्षक आणि अंतर्गत परीक्षक एकमेकांशी चर्चा करून प्रोजेक्टसाठीची तारीख निश्चित करतील, तसेच विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

    २०२१ या वर्षी १२ वीच्या परीक्षांबाबत नोंदणीकृत उमेदवारांसाठीचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.दरम्यान, सीबीएसईने देशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे गुणांकन करण्याच्या अनुषंगाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्यांचे गुण अपलोड करण्यास सीबीएसई प्रादेशिक विभागाने शाळांना कळविले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सीबीएसई शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहून प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.