chanda kochar

दीपक यांच्या मालकीच्या पॅसिफिक कॅपिटल फायनान्शियल प्रा. लि. या कंपनीतही एका चपराशाला संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. शरद म्हात्रे असे त्याचे नाव असून दीपक त्याच्याकडून अनेकदा कागदपत्रांवर सह्या घ्यायचे, असा जबाब त्याने ईडीकडे नोंदविल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या कंपनीतील अनेक संचालक कोचर यांचे नातेवाईक किंवा सामान्य कर्मचारी होते.

दिल्ली : आयसीआयसीआय बँक लाच प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आयसीआयसीआय बँकेच्या माजी प्रबंध संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हीडिओकॉन ग्रुपचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी त्यांचा चपराशी, चालक, माळी आणि अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कंपनीचे डमी डायरेक्टर म्हणून नियुक्त केले होते असा खळबळजनक खुलासा केला आहे.

दीपक यांच्या मालकीच्या पॅसिफिक कॅपिटल फायनान्शियल प्रा. लि. या कंपनीतही एका चपराशाला संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. शरद म्हात्रे असे त्याचे नाव असून दीपक त्याच्याकडून अनेकदा कागदपत्रांवर सह्या घ्यायचे, असा जबाब त्याने ईडीकडे नोंदविल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या कंपनीतील अनेक संचालक कोचर यांचे नातेवाईक किंवा सामान्य कर्मचारी होते.

सर्व संबंधित अनभिज्ञच

– ज्या लोकांची नावे ईडीच्या आरोपपत्रात आहे त्यांनी त्या कंपन्यांबाबत कोणतीच माहिती नसल्याचा कबुलीजबाब ईडीकडे नोंदविला आहे.

– १९९४ मध्ये अहमदनगरमध्ये धूत यांच्या बंगल्यात सफाई काम करणाऱ्या केशरमल नैनसुखलाल गांधी यांना इंडियन रेफ्रिजरेटर कंपनी लिमिटेडमध्ये संचालक दाखविले आहे. याची केशरमल यांना कोणतीही माहिती नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांना देवाणघेवाणीचीही कोणतीही माहिती नव्हती.

– धूत यांच्या निर्देशावरूनच कागदपत्रांवर स्वाक्षरी करीत असत तसेच कंपनीच्या कोणत्याही बोर्ड बैठकीत सहभागी झालो नसल्याचेही त्यांनी सांगितले.

– एन्क अन्य कर्मचारी लक्ष्मीकांत सुधाकर कटोरे यांनी १५ वर्षे व्हीडिओकॉन इंटरनॅशनलमध्ये माळी म्हणून काम केले. ते सुद्धा विविध कंपन्यांमध्ये संचालक पदी असल्याबाबत अनभिज्ञ होते. कटोरे यांना कंपनीकडून केवळ १० हजार रुपये वेतन मिळत होते.

– व्हीडिओकॉनचा लेखाजोखा तयार करणारे वसंत शेषराव काकडे यांना तर समुहाच्या १०० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. त्यांनीही स्वाक्षरी करण्यापूर्वी कोणतेही दस्तावेज वाचले नव्हते.

चंदा कोचर यांनीच केली होती गुंतवणुकीची शिफारस

चंदा कोचर यांनी त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दीपक यांच्या मालकीच्या न्यूपॉर रिन्युएबल प्रा. लि. या कंपनीत वेणुगोपाल धूत यांनी ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, चंदा कोचर यांनी त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक करून काळजी घेण्यास धूत यांना सांगितले होते. कर्जाचे ३०० कोटी मिळताच ६४ कोटी रुपये पॅसिफिक कॅपिटलकडे वळविल्याचे धूत यांनी सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे.