निष्काळजी : 50% मास्क लावतच नाहीत, 64% मास्कमुळे नाक झाकत नाहीत, 20% हनुवटीवर लावतात आणि 2% गळ्यात लटकवितात

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे व त्यात स्पष्टीकरण केले आहे की, धोका वाढत असतानाही देशातील 50 टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत. मास्क घालणाऱ्यांपैकीही अनेकजण फक्त चेहराच झाकतात, नाक उघडे ठेवतात. काहींचा मास्क तर हनुवटीवर आलेला असतो, असेही दिसून आले आहे.

  दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढतच जात आहे व रोज सुमारे 4,000 लोकांचा मृत्यू होत आहे व लाखो लोक संक्रमित होत आहे. डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून मास्क लावण्याचा व सोशल डिस्टेन्सिंगचा सल्ला दिला जात असतानाही अजूनही लोक त्याचे पालन करीत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे व त्यात स्पष्टीकरण केले आहे की, धोका वाढत असतानाही देशातील 50 टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत. मास्क घालणाऱ्यांपैकीही अनेकजण फक्त चेहराच झाकतात, नाक उघडे ठेवतात. काहींचा मास्क तर हनुवटीवर आलेला असतो, असेही दिसून आले आहे.

  निष्काळजीपणा वाढतच आहे

  देशात कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने एक नव्हे तर डबल मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, लोकांचा निष्काळजीपणा कमी होण्याची चिन्हे नाहीत. देशातील लाखो लोकांचा कोरोनाने जीव गेला असला तरी इतरांनी त्यापासून धडा घेतलेला नाही. देशात सर्वच ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडही आकारला जातो. मात्र, केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल अर्धा देश म्हणजेच 50 टक्के लोक मास्क वापरतच नाही.

  फक्त 14% लोकांकडून योग्य वापर

  फक्त 14 टक्के लोक मास्क नीट लावत आहेत. मास्क लावणाऱ्यांपैकी 64 टक्के भारतीय मास्क तोंडावर लावतात. पण नाक उघडेच ठेवतात. त्यानंतर 20 टक्के भारतीय मास्क घालतात, पण तो तोंडावर नसून हनुवटीवर घालतात. 2 टक्के भारतीय तर मास्क हनुवटीवरही न लावता थेट गळ्यावर ठेवतात. फक्त 14 टक्के भारतीय योग्य प्रकारे मास्क लावतात. शास्त्रीय पद्धतीने यामध्ये मास्कद्वारे नाक, तोंड, हनुवटी झाकली गेलेली असते.
  25 शहरांतील 2000 लोकांवर सर्व्हेक्षण

  देशभरातील 25 शहरांमधील 2000 लोकांवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी नमुना पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डबल मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. पण लोक एकही मास्क लावत नसल्याचे उघड झाले आहे.