काँग्रेस पक्षात मोठ्या फेरबदलांची रणनिती, अध्यक्षपदी राहुल गांधी की युवा काँग्रेस नेते ?

गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यपदाचा कार्यभार सोनिया गांधी सांभाळत आहेत. तसेच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक पक्षाकडून आतापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.  राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

    २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांंची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आगामी निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस पक्षात मोठे फेरबदलांची रणनिती पक्षाकडून आखली जात आहे. याशिवाय पक्षात आता युवा काँग्रेस नेत्यांना मोठी संधी देण्याचा मानस पक्ष श्रेष्ठींचा आहे.

    एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पक्षात लवकरच चार कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक केली जाण्याची आशा आहे. पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात हे कार्यकारी अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांना मदत करणार आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक आणि रमेश चेन्नीथला यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, प्रियांका गांधी वाड्रा यांना दिल्या जाणाऱ्या नव्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यपदाचा कार्यभार सोनिया गांधी सांभाळत आहेत. तसेच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक पक्षाकडून आतापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.  राहुल गांधी हे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तयार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु यंदाच्या मे महिन्यात कोरोना महामारीचं कारण देत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा टाळण्यात आली होती.

    २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर  पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाच्या निवडीची मागणी काँग्रेस पक्षात केली जात आहे.