कैमला घटनेनंतर हरयाणात वादंग; खट्टर सरकार हादरले

मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्या दिल्लीवारीत उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सुद्धा उपस्थित राहतील. दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील राजकीय घडामोडींबाबत माहिती देणार आहे.

दिल्ली: करनाल येथील कॅमला गावातील घटनाक्रमानंतर हरयाणात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. अशातच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर दिल्लीवारी करणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अहवाल सादर करतील. तर हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत जननायक जनत पार्टीच्या आमदारांची बैठक घेणार आहे. यापूर्वी ३ दिवसांपूवी मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील शेतकरी आंदोलनाबाबत सविस्तर माहिती दिली होती.

भाजपा पक्षश्रेष्ठींना बसला धक्का
माहितीनुसार मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्या दिल्लीवारीत उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला सुद्धा उपस्थित राहतील. दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील राजकीय घडामोडींबाबत माहिती देणार आहे. उल्लेखनीय असे की, करनाल आणि कैमला गावामध्ये आयोजित किसान महापंचायत कार्यक्रमात तोडफोड करण्यात आली होती. या घटनाक्रमावरून भाजपा पक्षश्रेष्ठींना मोठा धक्का बसला आहे. राज्यात यापूर्वी काही युवकांनी मंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना रोखले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभेत गदारोळ घालण्यात आला. ही बाब भाजपा पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेत पक्षातील रणनितीकार सक्रीय झाले आहे. आतापर्यंत राज्यातील प्रमुख शेतकरी कृषी कायद्यांविरोधात नव्हते. परिणामी दिल्ली सीमेवरील आंदोलनात हरयाणातील शेतकऱ्यांची संख्या फार कमी होती.

अविश्वास ठराव आणणार : हुड्डा
हरयाणातील खट्टर सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांसोबत संघर्षाची स्थिती निर्माण करीत आहे, असा आरोप वरिष्ठ नेता भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केला आहे. करनालसारखे कार्यक्रम घेण्याऐवजी सरकारने कृषी कायदे परत घेण्याकरिता केंद्राकडे आग्रह करावा. भाजपा-जजपा सरकारविरोधात काँग्रेस अविश्वास ठराव आणणार, असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

काँग्रेसचे मनसुबे यशस्वी होणार नाही : कटारिया
कॅमला गावातील घटनाक्रम म्हणजे काँग्रेसने लिहिलेली पटकथा असल्याचा आरोप केंद्रीय जलविद्युत राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी केला. हरयाणा येथील शेतकऱ्यांच्या मागे काँग्रेसचा हात असून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.