अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णालयात लागली आग, ८ रुग्णांचा आगीमुळे मृत्यू

  • आगीत कोरोनाचे ८ रुग्ण होरपळून मरण पावले आहेत. मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. अद्याप रुग्णालयाकडून याची अधिकृतपणे माहिती मिळाली नाही.

गुजरात : अमदाबाधील नवरंगपुरा येथील कोविड रुग्णालयात आग लागली. ही आग रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागल्याचे समजले आहे. आगीत कोरोनाचे ८ रुग्ण होरपळून मरण पावले आहेत. मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जाते. अद्याप रुग्णालयाकडून याची अधिकृतपणे माहिती मिळाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटूंबाला दोन लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सीएम विजय रुपाणी यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव संगीता सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पथकाला चौकशी अहवाल ३ दिवसात सादर करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरंगपुरा येथील कोविड -१९ डेडिकेटेड श्रेय हॉस्पिटल पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली.

आयसीयूमध्ये लागली आग 

आयसीयूमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर ती पसरली. यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली. रुग्ण इकडे तिकडे पळू लागले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. आयसीयू वॉर्डला चौथ्या मजल्यावर आग लागली. सुरुवातीच्या अहवालांमध्ये शॉर्टसर्किट म्हणून आगीचे कारण सांगण्यात आले आहे.

या आगीत आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात ५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी ५० हून अधिक रुग्णांना वाचवले. ४० रूग्णांना रुग्णालयाच्या दुसर्‍या वॉर्डमध्ये हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ अहमदाबादच्या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मी दु:खी आहे. मृतांच्या नातेवाईकांबद्दल दु:खात सहभागी आहे. अपघातात जखमी झालेले लवकरच निरोगी व्हावेत. सीएम विजय रुपाणी जी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल जी यांच्याशी परिस्थितीबद्दल चर्चा केली. प्रशासन बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.