…तरच कोविड रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावता येणार; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली : कोरोनाग्रस्त रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावणे अयोग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोविड- १९ रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्याबाबतच्या प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने यास परवानगी नाकारली आहे. केंद्र सरकारने याआधीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडव्हायझरी जारी केली आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडे रुग्णांच्या घराबाहेर कोविड-१९ चे पोस्टर्स लावण्यासारखे कोणते कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आपत्कालिन प्रबंधन अनियनियमाअंतर्गत सक्षम अधिकाऱ्याने विशिष्ट निर्देश जारी केल्यानंतर अशा प्रकारची पोस्टर्स चिकटवली जाऊ शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे.

गेल्या गुरुवारी या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आमच्या सरकारची अशी प्रकारची कोणतीही गाइडलाइन्स नसल्याचे महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी म्हटले आहे. कोणी अनोळखी व्यक्ती घरात शिरू नये यासाठी काही राज्यांनी असे केले आहे. दिल्ली, पंजाब आणि ओडिशा या राज्यांनी अशा प्रकारे पोस्टर्स चिकटवण्यावर बंदी घातली असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

राज्य सरकार असे करण्यासाठी अॅडव्हायजरी जारी करू शकते का, असा प्रश्न कोर्टाने सॉलिसिटर जनरल मेहता यांना विचारला. त्यावर राज्यांना पत्र लिहिले असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.