‘तुम्ही काय तपास यंत्रणा आहात काय?”

माध्यमांनी बातम्या देण्याचे काम करावे, चौकशी यंत्रणांच्या कक्षेत येण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत न्यायालयानं ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला खडे बोल सुनावले आहेत.

हे प्रकरण आहे ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीबाबतचं. या प्रकरणात गोपनीय जबाब अवाजवी पद्धतीनं जाहीर केल्याचा आरोप झी न्यूजवर आहे. याबाबतच्या सुनावणीत, तुम्ही स्वतःला चौकशी यंत्रणा समजता का, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केला.

दंगल प्रकरणाशी संबंधित जी कागदपत्रं पुरावा म्हणून दाखवण्यात आली, त्यांना नगण्य मूल्य असून एखाद्या व्यक्तीचं चित्रण करण्यासाठी हेतुतः अवास्तव पद्धतीं त्यांचा वापर केल्याचं दिसत असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय.

 जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थी आसिफ इक्बालने यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. संबंधित कागदपत्रं प्रसिद्ध करण्यासाठी नव्हती, असं सुनावताना हा प्रकार म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास असल्याचे मत न्या. विभू बाख्रू यांनी व्यक्त केलं.

याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबाचा स्रोत त्यात नमूद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ‘झी न्यूज’ला दिले.