Delhi riots case; Ishrat Jahan attacked in jail

दिल्ली : आपल्यावर तुरुंगात हल्ला झाल्याचा दावा दिल्ली दंगलीतील आरोपी इशरत जहाँ हिने केला आहे. या प्रकरणात इशरतच्या वकिलांकडून न्यायालयात एक अर्जही दाखल करण्यात आला असून इशरत हिच्यावर तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला तसेच तिला मारहाण करण्यात आल्याचे या अर्जात म्हटले आहे.

तुरुंगातील इतर महिला कैद्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा इशरतने केला आहे. तुरुंगात झालेल्या या हल्ल्यानंतर इशरत मानसिक तणावाखाली आहे. तसंच तुरुंगात राहणे तिच्यासाठी कठीण झाल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे.

तिहार तुरुंगाचे पोलिस महासंचालक संदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशरत जहाँ आणि इतर महिला कैद्यांमध्ये तुरुंगात भांडण झाले होते. त्यानंतर पुढचा वाद टाळण्यासाठी इशरत जहाँ आणि संबंधित महिला कैद्यांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये हलवण्यात आले आहे. दिल्ली दंगली प्रकरणी इशरत जहाँ हिच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.