हिरे व्यापारी मेहुल चोकसीला मिळाला अंतरिम जामीन; उपचारासाठी एंटिगुआ-बारबुडाला जाण्यास परवानगी 

बेकायदेशीररित्या डोमिनिकात प्रवेश केल्याप्रकरणी मेहूल चोकसीला २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. याला चोकसीने हायकोर्टात आव्हान दिले होते. तर आपल्याला एंटिगुआ-बारबुडाहून अपहरण करुन डोमिनिकात आणण्यात आल्याचा युक्तीवाद मेहुलकडून करण्यात आला होता. मात्र डोमिनिकात बेकायदेशीरित्या प्रवेश केल्याप्रकरणी सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर, त्याला अटक करण्यात आली होती.

  नवी दिल्ली : परदेशात पळून गेलेला, कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिका कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. चौकसीची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी एंटिगुआ-बारबुडाला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रकृती बरी झाल्य़ानंतर, त्याला पुन्हा कोर्टाच्या सुनावणीसाठी यावे लागणार आहे.

  बेकायदेशीररित्या डोमिनिकात प्रवेश केल्याप्रकरणी मेहूल चोकसीला २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. याला चोकसीने हायकोर्टात आव्हान दिले होते. तर आपल्याला एंटिगुआ-बारबुडाहून अपहरण करुन डोमिनिकात आणण्यात आल्याचा युक्तीवाद मेहुलकडून करण्यात आला होता. मात्र डोमिनिकात बेकायदेशीरित्या प्रवेश केल्याप्रकरणी सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर, त्याला अटक करण्यात आली होती.

  डोमिनिकात पोहचण्यापूर्वी मेहुल चोकसीने एंटिगुआचे नागरिकत्व २०१७ साली मिळवले होते, व तो २०१८ पासून तिथेच राहत होता. २३ मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्याला डोमिनिकात पकडण्यात आले. या सर्व प्रकरणात एंटिगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांची एक चिठ्ठीही समोर आली होती, यात मेहुल याने नागरिकतेबाबत माहिती लपविल्याचा उल्लेख होता.

  १४ ऑक्टोबर २०१९ रोजी लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधान ब्राऊन यांनी नागरिकत्वाची माहिती जाणीवपूर्वक लपविल्याप्रकरणी मेहुल याचे एंटिगुआ आणि बारबुडाचे नागरिकत्व रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

  १४,५०० कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोकसी जानेवारी २०१८ मध्ये परदेशात पळून गेला होता. त्याने त्यापूर्वीच २०१७ साली एंटिगुआ-बारबुडाचे नागहरिकत्व मिळवले होते. या घोटाळ्याचा तपास करीत असलेली ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रकृती बरी नसल्याचे कारण देत, मेहुल चौकसीने भारतात खटल्यासाठी येण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. या प्रकरणात त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येते आहे. भारतातील त्याची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आलेली आहे.

  नीरव मोदीला भारतात आणण्याची मिळाली आहे मंजुरी

  या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, आणि मेहुल चौकसीचा भाचा नीरव मोदी सध्या लंडनच्या कोर्टात आहे. तिथल्या कोर्टाने आणि सरकारने नीरवच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे, मात्र या निर्णयाला लंडनच्या हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील १० ते १२ महिन्यात हायकोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.